शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराणने हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर जवळपास दोन तासांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याने सर्व लष्करी तुकड्यांना गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर याबाबतचे निवेदन जारी करण्यात आले.
शस्त्रसंधीवर इराणने काय म्हटले?
इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अराघची यांनी ट्विट करत इराणची अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अराघची यांनी इराणच्या 'सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल'च्या (SNSC) वतीने एक महत्त्वपूर्ण विधान प्रसिद्ध केले आहे. या निवेदनाद्वारे इराणने या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे. जर इराणवर होणारे हल्ले थांबले, तर इराण आपली बचावात्मक लष्करी कारवाई थांबवेल आणि जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' दोन आठवड्यांसाठी खुली करेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
advertisement
परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. या निवेदनात त्यांनी प्रामुख्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मनापासून आभार मानले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इराणने ही भूमिका घेतल्याचे समजते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (POTUS) आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत माहिती देताना अराघची म्हणाले की, अमेरिकेने मांडलेल्या १५ कलमी प्रस्तावावर चर्चा करण्यास इराण तयार आहे. तसेच, अमेरिकेने इराणच्या १० कलमी प्रस्तावाचा आराखडा चर्चेसाठी आधार म्हणून स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले. या सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणने जाहीर केले की, "जर इराण विरोधातील आक्रमकता थांबली, तर आमचे सशस्त्र दल आपले आत्मसंरक्षणात्मक ऑपरेशन स्थगित करतील."
या काळात इराणच्या लष्कराशी समन्वय साधून आणि तांत्रिक मर्यादांचे पालन करून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतुकीसाठी १५ दिवसांचा मार्ग (Safe Passage) उपलब्ध करून दिला जाईल, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, आता अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश यावर काय भूमिका घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
