काठमांडू: नेपाळी लष्कराच्या मुख्यालयाबाहेर सलग दुसऱ्या दिवशी तणाव वाढला आहे. अंतरिम नेत्याच्या निवडीवरून Gen Z आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. गुरुवारी दुपारी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की आणि काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्या समर्थकांमध्ये लष्कराच्या मुख्यालयाबाहेर जोरदार वाद झाला. अंतरिम सरकारचे नेतृत्व कोणी करावे यावरून त्यांच्यात हाणामारी झाली.
advertisement
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि बेरोजगारीच्या विरोधात अनेक आठवड्यांपासून आंदोलन करत असलेले हेच आंदोलक बुधवारी संध्याकाळीही याच ठिकाणी नेतृत्वाच्या प्रश्नावरून तीव्र वाद-विवाद करताना दिसले. या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर निदर्शने अधिकच हिंसक झाली होती. यानंतर सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दुसऱ्या दिवशी सकाळी अंतरिम नेतृत्वावर एकमत करून परत येण्यास सांगितले होते.
आजचा नकाशा वेगळाच असता, नेपाळ भारताचे राज्य होणार होतं; कोणी नकार दिला?
‘खबरहब’ या वृत्तसंस्थेने या घटनेची सर्वप्रथम माहिती दिली आणि सैन्याच्या मुख्यालयाबाहेर एका आंदोलकाने दुसऱ्या आंदोलकाला मारहाण करत असल्याचा फोटो देखील शेअर केला. मात्र ‘न्यूज18’ या वृत्तसंस्थेने या चित्राच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. त्यांच्या अहवालानुसार माजी सरन्यायाधीश कार्की यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून विरोध करणारी घोषणाबाजी एका गटाने दिल्यानंतर ही हाणामारी सुरू झाली.
नेपाळमध्ये सर्वात मोठी उलथापालथ, लोडशेडिंग संपवणारा अभियंता आता पंतप्रधानपदी
सुशीला कार्की यांच्या समर्थकांचे आणि बालेन शाह यांच्या समर्थकांचे लवकरच जोरदार भांडण झाले. तर धरनचे महापौर हरका संपंग यांच्याशी संबंधित एक लहान गटही यात सामील झाला. घोषणाबाजीने सुरू झालेला हा वाद लवकरच हाणामारी आणि टोळीच्या भांडणात बदलला, ज्यामुळे हा परिसर अशांततेचा केंद्रबिंदु बनल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या अहवालात असेही नमूद केले आहे की- हाणामारी वाढत असल्यामुळे नेपाळी लष्कराच्या जवानांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
यापूर्वी एका लष्करी प्रवक्त्याने एएफपीला सांगितले की- लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिगडेल यांनी बुधवारी महत्त्वाच्या व्यक्ती आणि ‘जेन झी’ च्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती.
सरकारच्या अल्पकालीन सोशल मीडिया बंदी आणि दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सोमवारी काठमांडूमध्ये सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये हिंसक कारवाईमुळे आधीच किमान 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारपर्यंत ही अशांतता देशभरात पसरली होती. ज्यात सरकारी कार्यालये, एक मोठे हॉटेल आणि इतर इमारतींना आग लावण्यात आली. या गोंधळात देशभरातील तुरुंगांमधून 13,500 हून अधिक कैदी पळून गेले आहेत.
नेपाळचे अध्यक्ष राम चंद्र पौडेल यांनी गुरुवारी देशात शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की- राज्यघटनेच्या चौकटीत तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या कठीण परिस्थितीत मी संकटाचे निराकरण, लोकशाहीचे संरक्षण आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यावर विचारमंथन करत आहे. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की आंदोलक नागरिकांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि सर्वांनी संयमाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.