जागतिक वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी श्रीलंकेच्या सागरी हद्दीत एका इराणी व्यापारी जहाजाला अज्ञात पाणबुडीने लक्ष्य केले. हा हल्ला इतका भीषण होता की, जहाजावरील 101 जण अद्याप बेपत्ता आहेत तर 78 जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीलंकेचे नौदल सध्या घटनास्थळी बचावकार्य राबवत आहे. या हल्ल्याने हिंदी महासागरातील व्यापारी मार्गांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
तेहरानवर इस्रायलचा कहर
दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून सातत्याने विमान हल्ले आणि बॉम्बवर्षाव केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. इस्रायलच्या या आक्रमक पावित्र्यामुळे तेहरानमध्ये प्रचंड खळबळ माजली असून नागरिक सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत आहेत. अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे इराण पूर्णपणे एकाकी पडला असला तरी, इराणनेही प्रतिहल्ल्याची तयारी दर्शवली आहे.
भारताची चिंता वाढली
आखाती देशांतील हे युद्ध आता भारताच्या शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेच्या समुद्रापर्यंत पोहचल्याने भारताची चिंता वाढली आहे. हिंदी महासागरात होणारे हे हल्ले भारताच्या सागरी व्यापारासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. जर हा संघर्ष असाच वाढत राहिला, तर त्याचे पडसाद कच्च्या तेलाच्या किमतीवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवशीही युद्धाचा भडका शांत होण्याऐवजी अधिकच तीव्र होत असून, जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
