मेक्सिकोच्या आखातात निर्माण झालेलं हरिकेन मिल्टन वेगाने फ्लोरिडाच्या दिशेने सरकलं. मिळालेल्या माहितीनुसार, हे वादळ रविवारी टँपापासून सुमारे 780 मैल (1,255 किलोमीटर) दूर नैर्ऋत्य दिशेला होतं. वाऱ्यांचा जास्तीत जास्त वेग ताशी 85 मैल (140 किलोमीटर) होता. मिल्टन वादळ ताशी 7 मैल (11 किलोमीटर) वेगाने पूर्वेकडे फ्लोरिडाच्या दिशेने सरकत होतं. अखेर या वादळाने फ्लोरिडामध्ये थैमान घातलं.
advertisement
फ्लोरिडामध्ये कित्येक घरं कोसळली, मुसळधार पावसामुळे, विजांचा कडकडाट झाला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. जो नकाशा दिसतो आहे तो फ्लोरिडाचा आहे. त्या संपूर्ण भागात मिल्टन वादळ पसरलं आहे. वरून विजा चमकतानाही दिसत आहे. हे दृश्य पाहूनच आपल्याला धडकी भरते. अंगावर अक्षरश: काटा येतो.
मिल्टन हे गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेला धडकणारं दुसरं मोठं वादळ. काही दिवसांपूर्वी आलेल्या हेलन चक्रीवादळामुळे उत्तर कॅरोलिनामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. हेलनने दक्षिण अमेरिकेत किमान 225 जणांचा बळी घेतला होता आणि 250 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
Do You Know : भूगर्भातील गुपित उलगडणारा प्राणी, ज्याला आधीच कळतात भूकंपाचे धक्के
गेल्या काही काळापासून जगाच्या विविध भागांमध्ये सातत्याने वादळं येत आहेत. विशेष म्हणजे त्यांची तीव्रता प्रत्येक वेळी वाढत आहे. गेल्या 6 महिन्यांत अटलांटिक महासागरात 13 वादळं आली आहेत. त्यापैकी चार वादळं अमेरिकेला धडकली आहेत. त्यात हेलन आणि बेरील यांचा समावेश आहे. या वादळांमुळे अमेरिकेतल्या चौथ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर असलेल्या ह्यूस्टनमधला वीजपुरवठा खंडित झाला होता.
हरिकेन म्हणजे काय?
नासाच्या जागतिक पर्जन्यमापन अहवालानुसार, हरिकेन, टायफून आणि सायक्लोन हे वादळांचे तीन प्रकार आहेत. वादळांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते त्यानुसार त्यांचा प्रकार ठरतो. उत्तर अटलांटिक, मध्य आणि ईशान्य पॅसिफिक महासागरात विकसित होणाऱ्या वादळांना 'हरिकेन' म्हणतात. दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांना 'सायक्लोन' म्हणतात. वायव्य पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांना 'टायफून' म्हणतात.
