मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकपॉट ड्रॉ 7 ऑक्टोबर 2025 रोजी झाला आणि विजेत्याचे तिकीट न्यू साउथ वेल्सच्या हंटर व्हॅली प्रदेशातील ईस्ट मेटलँडमधील स्टॉकलँड शॉपिंग सेंटर येथे असलेल्या ग्रीनहिल्स न्यूज एजन्सीमध्ये विकले गेले. लॉटरी कंपनीने विजेत्याला पुढे येऊन त्याचे लॉटरी बक्षीस घेण्याचे आवाहन करण्यासाठी देशभर मोहीम सुरू केली आहे. पण, सोडतीनंतर 38 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही, भाग्यवान खेळाडूचा अद्याप पत्ता लागलेला नाही. लॉटरी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ज्या व्यक्तीने तिकीट खरेदी केले होते ती व्यक्ती लोट्टो मेंबर्स क्लबमध्ये नोंदणीकृत नव्हती आणि म्हणूनच त्यांना त्याच्याशी संपर्क साधता आला नाही.
advertisement
आतापर्यंतचा सर्वात मोठा जॅकपॉट
ग्रीनहिल्स न्यूज एजन्सीच्या कर्मचारी टिएर्ना पेरी म्हणाल्या, 'हा आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जॅकपॉट आहे. आम्ही यापूर्वी जिंकणारी तिकिटे विकली आहेत, पण ती इतक्या रक्कमेच्या जवळपासही नव्हती. आम्हाला आशा आहे की त्या व्यक्तीला लवकरच कळेल की तोच नवीन करोडपती आहे'.
दरम्यान, लॉटरी कंपनीच्या प्रवक्त्या कॅट मॅकइन्टायर म्हणाल्या की या परिस्थितीमुळे आम्हाला धक्का बसला आहे. "कोणी फिरत असेल, कदाचित आज कामावरही जात असेल आणि त्यांच्या खिशात जवळजवळ 125 कोटी रुपये आहेत हे त्यांना माहित नसेल, असा विचार करणेही अविश्वसनीय आहे'.
विजेता सापडला नाही तर पैशांचे काय?
वृत्तांनुसार, अधिकारी आता दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत जेणेकरून विजेते तिकीट कोणी खरेदी केले हे निश्चित होईल. जरी तिकीट हरवले तरी, विजेत्याला न्यू साउथ वेल्स लॉटरी कायद्यांतर्गत दावा दाखल करण्यासाठी सहा वर्षे आहेत. पण, जर कोणीही दावा दाखल केला नाही तर बक्षीस राज्याच्या तिजोरीत परत केले जाईल.