नवीन वर्षाच्या (2025) स्वागताची तयारी सुरू झाली आहे. 31 डिसेंबरला रात्री अनेक जण पार्टी करतात. नवीन वर्षाच्या स्वागतात अनेक जणांचं भान इतकं हरपून जातं, की मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघनदेखील केलं जातं. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावं लागते. मोठा दंड भरावा लागतो किंवा रात्र तुरुंगात काढावी लागते. जर तुम्हाला नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करायचं असेल आणि रात्री ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल तर वाहतुकीबाबतचे काही नियम माहिती असणं गरजेचं आहे.
advertisement
नवीन वर्षाच्या स्वागताला पार्टी करण्यात काही गैर नाही; पण ड्रिंक अँड ड्राइव्ह टाळा. मद्यपान करून वाहन चालवल्यास अपघाताचा धोका वाढतो. तसंच पकडलं गेल्यास तुरुंगवासदेखील होऊ शकतो. पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करू शकतात. त्यामुळे गाडी चालवताना नियमांचं पालन करा.
नवीन वर्षाचं स्वागत करताना जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर ती वेगात चालवू नका. ओव्हरस्पीडिंग तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तसंच अपघात होऊ शकतो. अशा स्थितीत पोलिसांनी पकडल्यास दंड वसूल केला जाऊ शकतो किंवा तुरुंगाची हवादेखील खावी लागू शकते.
कार चालवताना सीट बेल्ट अवश्य लावा. सीट बेल्ट न लावता ड्रायव्हिंग करू नका. असं केल्यास पोलीस तपासणीवेळी तुमच्या अडचणी वाढू शकतात आणि दंड भरावा लागू शकतो.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही पार्टी करण्याकरिता कारमधून जात असाल तर गाडीची सर्व कागदपत्रं जवळ बाळगा, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, व्हॅलिड इन्शुरन्स आणि पीयूसी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दिल्ली एनसीआरमध्ये रात्री पोलीस जागोजागी लक्ष ठेवून असतील. तसंच देशात सर्वत्र तपासणी सुरू असेल. कागदपत्रांविना प्रवास करत असाल तर तुम्हाला दंड होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊन नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करा.