राजघराण्यात जन्म घेतल्यानंतर राजा होता येईल, किंवा एखाद्या किल्ल्यामध्ये राहण्यास मिळेल, असं ज्यांना वाटत असेल, त्यांच्यासाठी एक खास संधी आली आहे. यूकेमधील हेरफोर्डशायरमध्ये एक ऐतिहासिक किल्ला विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याची किंमत आलिशान बंगल्यापेक्षा कमी आहे.
किती आहे किंमत?
यूकेच्या हेरफोर्डशायर येथे असलेला विगमोर कॅसलची विक्री करण्यात येणार आहे. सुरुवातीला या किल्ल्याची किंमत पाच लाख ब्रिटिश पाउंड म्हणजेच पाच कोटी 22 लाख रुपये ठेवण्यात आली होती. पण जवळपास सहा महिने कोणीही हा किल्ला खरेदी केला नाही. त्यामुळे आता या किल्ल्याची किंमत 50 हजार ब्रिटिश पाउंडने कमी करून चार लाख 50 हजार पाउंड म्हणजेच चार कोटी 70 लाख 52 हजार 504 रुपये ठेवण्यात आली. पण त्यानंतरही हा किल्ला खरेदी करण्यासाठी कोणी पुढं आलं नाही. विशेष म्हणजे हा किल्ला जंगलाच्या मधोमध बांधला गेला असून, हे ठिकाण खूप सुंदर आहे. मिररच्या वृत्तानुसार, हा किल्ला खरेदी करणाऱ्याला येथे वर्कशॉप, दोन बेडरूमचं घर, खासगी ड्राईव्ह वे बांधण्याची परवानगीही मिळणार आहे. पण त्यानंतरही किल्ला खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचं चित्र आहे.
advertisement
5 नाही तर फक्त 2 बोटं; या जमातीतील सगळ्या लोकांचे पाय पक्ष्यांसारखे, यामागचं कारण अजब
का खरेदी केला जात नाही किल्ला?
एखाद्या आलिशान बंगल्याच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत मिळूनही हा ऐतिहासिक किल्ला कुणी खरेदी न करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण हा किल्ला 956 वर्षे जुना असल्याने तो ऐतिहासिक वास्तू म्हणून सार्वजनिकच राहील. तसंच तो पाहण्यासाठी लोकांना खुला ठेवावा लागणार आहे. कारण हा यूकेमधील सर्वात महत्त्वाच्या अवशेषांपैकी एक आहे. अशा मालमत्ता तेथील कायद्यानुसार राज्य सचिवांच्या संरक्षणाखाली सार्वजनिक ठेवल्या जातात. यामुळेच किल्ला विकत घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे आगामी काळात या किल्ल्याची किंमत आणखी कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
