पॅरिसमधील लॉवरे संग्रहालयामध्ये ही खतरनाक चोरी झाली आहे. रविवारी सकाळी पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेले चार चोर लॉवरेच्या अपोलो गॅलरीमध्ये घुसले आणि चार मिनिटांत मौल्यवान दागिने चोरून मोटारसायकलवरून पळून गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कडक सुरक्षा असूनही, संपूर्ण चोरी चार मिनिटांपेक्षा कमी वेळात पार पडली. संग्रहालयात प्रवेश करण्यापासून ते चोरी करून पळून जाण्यापर्यंतचा वेळ पाच मिनिटांपेक्षा कमी होता.
advertisement
दागिन्यांमध्ये काय विशेष आहे?
चोरीत 19 व्या शतकातील आठ मौल्यवान दागिने गायब झाले. यामध्ये पन्ना आणि हिऱ्याचा एक हार, दोन मुकुट, दोन ब्रोच, एक नीलम हार आणि कानातले यांचा समावेश आहे. हे दागिने फ्रेंच राजघराण्याचा अभिमान मानले जात होते. 1887 मध्ये जेव्हा सरकारने शाही दागिन्यांचा लिलाव केला तेव्हा हे दागिने फ्रान्सच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याने विशेष जतन करण्यात आले होते.
जगातील सर्वात मोठी चोरी कशी घडली?
रविवारी सकाळी 9.30 वाजता संग्रहालय जनतेसाठी उघडल्यानंतर काही वेळातच हा दरोडा पडला. फ्रेंच गृहमंत्री लॉरेंट नुनेझ यांच्या मते, तीन ते चार चोर ट्रकवर बसवलेल्या क्रेनसह आले. त्यांनी संग्रहालयाच्या खिडकीतून आत प्रवेश करण्यासाठी क्रेनचा वापर केला. ते थेट गॅलरी डी'अपोलॉनमध्ये घुसले, आणि त्यांनी तिथे ठेवलेले काचेचे केस तोडले, यानंतर ऐतिहासिक दागिने चोरून ते मोटारसायकलवरून पळून गेले.
102 मिलियन डॉलरची हिरे चोरी
चोरलेल्या दागिन्यांमध्ये नेपोलियन तिसरा याने महाराणी युजेनीला दिलेला 2,000 हिरे आणि 200 मोत्यांचा मुकुट, नेपोलियन बोनापार्टने मेरी-लुईसला दिलेला एक पन्ना आणि 1,000 हिऱ्यांचा हार आणि राणी मेरी-अमेलीचा नीलमणी-हिऱ्याचा शिरपेच यांचा समावेश आहे. चोरांनी 1,354 हिरे आणि 56 पन्ना असलेला एक खराब झालेला मुकुट मागे सोडला. आजच्या पैशात हे दागिने 102 मिलियन डॉलर (₹8,950,127,904) पेक्षा जास्त किमतीचे असल्याचे वृत्त आहे. वृत्तांनुसार, फ्रेंच क्राउन ज्वेल्स चोरीला गेले होते, ज्यामध्ये नेपोलियन तिसरा यांच्या पत्नीचा मुकुट देखील समाविष्ट आहे. पण मुकुटाचा एक भाग संग्रहालयाबाहेर सापडला आहे.
दागिने कधीही सापडणार नाहीत
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे दागिने परत मिळवणे जवळजवळ अशक्य आहे. 77 डायमंड्सचे टोबियास कोर्मिंड म्हणाले, हे दागिने तुकडे करून विकले जाऊ शकतात, यामुळे ते इतिहासातून कायमचे पुसले जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या संग्रहालयात चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1911 मध्ये, लिओनार्डो दा विंचीचे मोनालिसाचे चित्र तेथील कर्मचाऱ्यांनी चोरले होते. पण दोन वर्षांनी हे चित्र सापडले आणि ते खूप प्रसिद्ध झाले.