Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशी आणि आवळ्याचा काय संबंध? आदि वृक्षासंबंधी ही कथा प्रसिद्ध
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची खास पद्धत आहे. पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का की या दिवशी आवळ्याच्या झाडाचीच पूजा का होते? आमलकी एकादशी आणि आवळ्याचा नेमका संबंध काय?
मुंबई : आज एकादशी तिथी आहे. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला खूप मोठं महत्त्व आहे आणि फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची खास पद्धत आहे. पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का की या दिवशी आवळ्याच्या झाडाचीच पूजा का होते? आमलकी एकादशी आणि आवळ्याचा नेमका संबंध काय? या दिवसाचं महत्त्व आणि त्यामागची रंजक कथा समजून घेऊया.
आमलकी एकादशीचं महत्त्व - हिंदू पंचांगानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. फाल्गुन महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करून विष्णू देवाची पूजा केल्याने जुन्या पापामधून सुटका मिळते आणि माणसाला पुण्य मिळतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आवळ्याच्या झाडाची निर्मिती कशी झाली?
असं मानलं जातं की जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली आणि सगळीकडे फक्त पाणीच पाणी होतं, तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंची खूप कठीण तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन जेव्हा विष्णू देव प्रकट झाले, तेव्हा त्यांना समोर बघून ब्रह्मदेव भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. असं म्हणतात की ब्रह्मदेवांच्या याच अश्रूंमधून आवळ्याच्या झाडाची निर्मिती झाली. म्हणूनच या झाडाला पृथ्वीवरचं पहिलं झाड किंवा आदि वृक्ष मानलं जातं.
advertisement
समुद्र मंथनाची कथा -
आवळ्याबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यातून अमृत बाहेर आलं होतं. या अमृताचे काही थेंब जमिनीवर सांडले आणि ज्या ज्या ठिकाणी हे थेंब पडले, तिथे आवळ्याची झाडं उगवली. म्हणूनच आवळ्याला अमृत फळ असंही म्हणतात, कारण त्यात औषधी गुण ठासून भरलेले असतात.
advertisement
आवळ्याच्या झाडाची पूजा का करतात?
पौराणिक कथेनुसार, आमलकी एकादशीच्या दिवशीच आवळ्याच्या झाडाचा जन्म झाला होता. असं मानलं जातं की या दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णू या झाडामध्ये वास करतात. म्हणूनच भक्त या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात आणि विष्णू देवाला आवळ्याचं फळ अर्पण करतात. मनापासून ही पूजा केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते, अशी धारणा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 7:41 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशी आणि आवळ्याचा काय संबंध? आदि वृक्षासंबंधी ही कथा प्रसिद्ध








