Air Hostess : एअर होस्टेस बनायचंय? काय आहे फिजिकल क्रायटेरिया? शिक्षणापासून सॅलरीपर्यंत सर्व माहिती
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
Air Hostess: एअर होस्टेस क्षेत्रात खूप चांगल्या संधी निर्माण होत आहेत.
मुंबई, 15 डिसेंबर : एअर होस्टेस हे खूप ग्लॅमरस करिअर आहे. या क्षेत्रात करिअर करण्याची अनेक तरुणी, महिलांची इच्छा असते. काही महिला कठोर मेहनतीतून हे स्वप्न पूर्ण करतात. एअर होस्टेस बनण्यासाठी विशेष शिक्षण, प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. तसंच त्यासाठी शारीरिक पात्रता, कम्युनिकेशन स्किल, वयोमर्यादा आदी गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
बोर्डाच्या परीक्षेचा निकाल घोषित होताच विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेशाची तयारी सुरू करतात. करिअर निवडीसाठी हे पहिलं पाऊल मानलं जातं. एअर होस्टेस हे जसं ग्लॅमरस तसंच आव्हानात्मक करिअर आहे. विमान कंपन्यांमध्ये अनेक प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध असतात. त्यात पायलट, एअर होस्टेस, फ्लाइट स्टीवर्डपासून ग्राउंड स्टाफपर्यंतचा समावेश असतो. या क्षेत्रात खूप प्रवास आणि कठीण कामाचा समावेश असतो.
advertisement
भारतात एअर होस्टेस बनण्यासाठी प्रामुख्याने तीन प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. त्यात सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा आणि डिग्रीचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्य, हॉस्पिटॅलिटी, नेव्हिगेशन टेक्निक, आपत्कालीन कौशल्य आणि विमानासंदर्भात प्राथमिक माहितीसह अन्न आणि पेयांविषयी प्रशिक्षण दिलं जातं. उमेदवार इयत्ता 12वीनंतर एअर होस्टेससाठीचा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात. काही कोर्स पदवीनंतरही उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येक संस्थेत वेगवेगळा असतो. फास्ट ट्रॅक सर्टिफिकेट कोर्स तीन महिन्यांचा असतो. तसंच सामान्य सर्टिफिकेट कोर्स सहा महिने ते एक वर्षाचा असतो.
advertisement
इयत्ता 12वीनंतर एअर होस्टेस डिप्लोमा करता येतो. तसंच पीजी डिप्लोमादेखील करता येतो. डिप्लोमाचा अभ्यासक्रम संबंधित संस्था निश्चित करतात. या सामान्य अभ्यासक्रमाचा कालावधी सहा ते बारा महिने असतो. हवाई क्षेत्रात एअर होस्टेसच्या पदवी अभ्यासक्रमाला जास्त महत्त्व असते. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असतो. यात दोन वर्षांचा विशेष पदवी अभ्यासक्रम असतो. एअर होस्टेस आणि एव्हिएशन हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय लक्षात घेऊन अभ्यासक्रम निश्चित केला जातो.
advertisement
एअर होस्टेस बनण्यासाठी इयत्ता 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उत्कृष्ट संवाद कौशल्य, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावं. विदेशी एअरलाइन्समध्ये काम करायचं असेल, तर परकीय भाषादेखील अवगत असावी.
एअर होस्टेस बनण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 17 तर कमाल वय 26 वर्ष असावं. हा नियम प्रत्येक एअर लाइन्स कंपनी आणि देशांमध्ये वेगवेगळा आहे. काही कंपन्या 30 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या एअर होस्टेसनाही नोकरीवर ठेवतात.
advertisement
काही भारतीय हवाई कंपन्या विवाहित महिलांना नोकरीवर ठेवत नाहीत. या संदर्भात विदेशी एअर लाइन्स कंपन्यांचे नियम वेगळे आहेत. काही कंपन्या एअर होस्टेसला चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्यास परवानगी देतात.
एअर होस्टेस बनण्यासाठी वजन शरीरानुसार असावं. तसंच उमेदवाराला कोणताही आजार नसावा. शारीरिकदृष्ट्या फिट असण्यासोबत एअर होस्टेसची दृष्टी चांगली असावी. काम करण्यासाठी आवश्यक किमान दृष्टी क्षमता 6/9 आहे.
advertisement
एअर होस्टेसची नियुक्ती करताना काही भौतिक गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. नोकरी ग्लॅमरस असल्याने लूकला महत्त्व दिलं जातं. तसंच उंची योग्य आहे की नाही, हेदेखील पाहिलं जातं. त्यासाठी एअर होस्टेसची उंची किमान पाच फूट दोन इंच किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
advertisement
इतर क्षेत्रांप्रमाणेच एअर होस्टेसचं वेतन अनुभवानुसार वाढत जातं. एअर होस्टेसला सुरुवातील पाच ते नऊ लाख रुपयांचं पॅकेज ऑफर केलं जातं. दोन किंवा तीन वर्षांनंतर त्यांचं मासिक वेतन एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वाढतं. काही विदेशी कंपन्या अधिक चांगलं पॅकेज ऑफर करतात.
एअर होस्टेसकडे विमानातल्या अनेक जबाबदाऱ्या असतात. प्रवाशांचं स्वागत करणं, उड्डाणापूर्वी ब्रीफिंग करणं, सीट बेल्ट लावण्यास सांगणं, त्याबाबत मार्गदर्शन करणं, प्रवासादरम्यान प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, प्रवाशांना अन्न आणि पेयं उपलब्ध करून देणं, उड्डाणाचा अहवाल तयार करणं, गरज पडल्यास प्रवाशांसाठी वैद्यकीय उपचारांची सोय करणं, प्रवाशांना सुरक्षा प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणं या जबाबदाऱ्या एअर होस्टेसला पार पाडाव्या लागतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 16, 2023 5:31 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Air Hostess : एअर होस्टेस बनायचंय? काय आहे फिजिकल क्रायटेरिया? शिक्षणापासून सॅलरीपर्यंत सर्व माहिती






