वडिलांकडे तक्रार केल्याचा घेतला रक्तरंजित बदला, विद्यार्थ्यानं प्राचार्याला शाळेतच संपवलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Student killed Principal: बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच प्राचार्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच प्राचार्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पीडित प्राचार्यानं आरोपी मुलाची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती. हा राग मनात धरून आरोपीनं शाळेच्या आवारातच आपल्या प्राचार्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने प्राचार्याची दुचाकी घेऊन पळ काढला. पण घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
संबंधित घटना मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यातली आहे. सुरेंद्र कुमार सक्सेना असं हत्या झालेल्या ५५ वर्षीय प्राचार्याचं नाव आहे. ते मागच्या पाच वर्षांपासून धमोरा राजकीय उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत होते. शुक्रवारी दुपारी एक वाजता शाळेतल्याच एका विद्यार्थ्यानं सक्सेना यांची हत्या केली आहे. या हत्येमागचं अधिकृत कारण समोर आलं नसलं तरी सक्सेना यांनी आरोपी विद्यार्थ्याची त्याच्या वडिलांकडे अनेकदा तक्रार केली होती. हाच राग मनात धरून आरोपीनं प्राचार्याला संपवल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी शाळेच्या आवारात मुलींची छेड काढत होता. त्यामुळे मुलींनी आरोपीची तक्रार शाळेच्या शिक्षकांकडे आणि प्राचार्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर शिक्षकांनी आरोपीला समज दिली. मात्र आरोपीच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही. तो अनेकदा शाळेत मुलींची छेड काढत होता. सतत घडणारा हा प्रकार पाहता, प्राचार्य सुरेंद्र कुमार सक्सेना यांनी आरोपी मुलाच्या वडिलांना शाळेत बोलावून घेत, त्याची तक्रार केली. या घटनेमुळं विद्यार्थ्याचा सक्सेना यांच्यावर राग होता. हा राग मनात धरून आरोपी मागील आठवडाभरापासून शाळेत कट्टा घेऊन येत होता. त्याने शाळेत अनेकांना धमकावलं होतं. ज्यांनी माझ्या वडिलांकडे माझी तक्रार केली, त्या शिक्षकांना जीवे मारणार, अशी उघड धमकी आरोपीनं शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर दिली होती.
advertisement
घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी एक वाजता आरोपी विद्यार्थी थेट प्राचार्य सक्सेना यांच्या कार्यालयात घुसला. परंतु तिथे प्राचार्य नव्हते. त्यामुळं त्यानं कार्यालयाच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांबाबत विचारलं. यावेळी एका विद्यार्थ्यानं सक्सेना बाथरुमच्या दिशेनं गेल्याचं सांगितलं. ही माहिती समजात आरोपी बाथरुमच्या दिशेनं गेला आणि त्यानं पाठीमागून थेट प्राचार्यांवर गोळीबार केला. यातली एक गोळी प्राचार्य सक्सेना यांच्या डोक्यात लागली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर आरोपीनं प्राचार्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला, मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी नौगांव परिसरातून ताब्यात घेतलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Chhatarpur,Chhatarpur,Madhya Pradesh
First Published :
December 07, 2024 11:10 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
वडिलांकडे तक्रार केल्याचा घेतला रक्तरंजित बदला, विद्यार्थ्यानं प्राचार्याला शाळेतच संपवलं


