दारूच्या पार्टीत ठरला चित्रपटासारखा दरोडा कट, भरदिवसा 60 लाख लुटले, बीडमध्ये खळबळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सुमारे 60 लाख रुपयांच्या दरोड्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या धक्कादायक घटनेमागे आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने आणि काटेकोर नियोजनाने कट रचल्याचे तपासातून उघड झाले आहे.
बीड : माजलगाव शहरात भरदिवसा घडलेल्या सुमारे 60 लाख रुपयांच्या दरोड्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या धक्कादायक घटनेमागे आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने आणि काटेकोर नियोजनाने कट रचल्याचे तपासातून उघड झाले आहे. दरोड्याच्या एक दिवस आधीच पात्रूड रोडवरील एका लॉजमध्ये आरोपींनी दारू आणि नॉनव्हेज पार्टीच्या आड बैठक घेतली होती. या बैठकीत दरोड्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला असून, प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी हा कट प्रत्यक्षात उतरवण्यात आला.
या गुन्ह्यामागील सूत्रधार सराफा कारागीर एकनाथ उर्फ नारायण अरुण कपाळे (वय 35) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 25 जानेवारी रोजी हा दरोडा घडवून आणण्यात आला. आरोपींनी दागिने घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवून योग्य क्षण साधत लूट केली. विशेष म्हणजे, पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून शहराबाहेर गेल्यानंतर आरोपींनी दुचाकी चालक बदलण्यासारख्या क्लुप्त्या वापरल्या होत्या.
advertisement
24 जानेवारीच्या रात्री लॉजवर झालेल्या गुप्त बैठकीनंतर तिघे आरोपी तेथेच मुक्कामी थांबले, तर उर्वरित दोघे परिसरात पाळत ठेवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून संजय विष्णुदास कांबळे आणि त्याचा साथीदार अमोल गायके यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. गायके दुचाकीवरून निघताच संजयने तात्काळ नारायण कपाळेला फोन करून इशारा दिला आणि दरोड्याचा कट अमलात आणण्यात आला.
advertisement
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तेलगाव ते गढी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. एलसीबीची चाहूल लागताच संजय कांबळे पुण्यातील भाड्याच्या खोलीला कुलूप लावून पसार होण्याच्या तयारीत होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचा एक साथीदार मात्र प्रेयसीसोबत पुण्यातून फरार झाला.
advertisement
या कारवाईत पोलिसांनी 18 तोळे सोने आणि सुमारे 1 किलो चांदी जप्त केली आहे. नारायण कपाळे, कृष्णा निरडे, अभिषेक शिंदे आणि संजय कांबळे या चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने केली. संपूर्ण दरोड्याचा कट एखाद्या चित्रपटातील कथानकासारखा असल्याची चर्चा आता नागरिकांत होत आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 9:28 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
दारूच्या पार्टीत ठरला चित्रपटासारखा दरोडा कट, भरदिवसा 60 लाख लुटले, बीडमध्ये खळबळ






