एक-एक करून कुटुंबातील लोक झाली गायब, 3 दिवसांनी सापडले आई आणि 2 मुलांचे मृतदेह, नेमकं घडलं काय?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
सोमवारी एक एक करत घरातील सदस्य गायब होण्यास सुरुवात झाली.तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह झाडीत टाकल्याची घटना समोर आली आहे.
भोजपूर: संपत्तीचा मोह एखाद्याला काय कृत्य करायला भाग पाडेल हे सांगता येत नाही. संपत्तीसाठी सख्खी भावंडं एकमेकांची वैरी होतात तर कुठे अगदी खूनही पडतात. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ट्रिपल मर्डरचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह झाडीत टाकल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एक एक करत घरातील सदस्य गायब होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी आई आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह सोन नदीच्या दियारा परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना भोजपूर जिल्ह्यातील अजीमाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील नुरपूर गावातील असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. शेजाऱ्यांनीच संपत्तीच्या वादातून या तिघांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
advertisement
मृतांमध्ये 50 वर्षांच्या शांती कुंवर आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. बुधन चौधरी हा 27 वर्षांचा तर सुधन चौधरी हा 25 वर्षांचा होता. एसपी प्रमोद कुमार यादव आणि एसडीपीओ राहुल सिंह यांनी या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने तपास सुरु केला. या खुनांमागचं रहस्य उलगडण्यासाठी श्वान पथकाची मदतही घेण्यात आली. एसपी प्रमोद कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधन चौधरी आणि त्यांचे शेजारी भोला चौधरी यांचा जमिनीबाबत वाद सुरु होता. त्यामुळे सोमवारी भोलाकडून बुधन आणि त्याच्या कुटुंबाला उद्याचा दिवस दिसणार नाही अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर एक एक करुन चौधरी कुटुंबातील सदस्य गायब होण्यास सुरुवात झाली.
advertisement
मंगळवारी सकाळी आपल्या दोन्ही मुलांना शोधायला निघालेल्या शांती कुंवरही गायब झाल्या. नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि तपास सुरु केला. तशातच गुरुवारी सकाळी सोन नदीच्या बाजूने काही तरी सडल्याचा वास येत असल्यामुळे ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता त्यांना तीन मृतदेह आढळून आले. पोलिस तपासात तिघांची हत्या 36 तासांपूर्वी झाल्याचं दिसत आहे. इतरत्र नेऊन हत्या करुन मृतदेह नदीकिनारी असलेल्या झाडीत फेकले असावेत असा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. या प्रकाराने ग्रामस्थ संतप्त झाले असून मृतांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
view commentsLocation :
Bihar
First Published :
August 17, 2024 9:17 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
एक-एक करून कुटुंबातील लोक झाली गायब, 3 दिवसांनी सापडले आई आणि 2 मुलांचे मृतदेह, नेमकं घडलं काय?


