तहान लागल्याने दरवाजा ठोठावला, शेवटी तोडून आत प्रवेश, वृद्ध दाम्प्त्याची अवस्था पाहून बसला धक्का
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात रविवारी वृद्ध दाम्पत्याच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली.
सोलापूर : सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात रविवारी वृद्ध दाम्पत्याच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली. बीएसएनएलमधून निवृत्त झालेले महादेव नरसप्पा मंचाळ वय 68 आणि त्यांची पत्नी रंगम्मा महादेव मंचाळ वय 62 राहणार कृष्णानगर, कुमठा नाका यांचा तोंड दाबून गुदमरवून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
महादेव मंचाळ यांच्या घरालगत असलेल्या मोकळ्या जागेत सध्या बांधकाम सुरू होते. रविवारी सकाळी तेथील कामगारांना तहान लागल्याने पाणी मागण्यासाठी त्यांनी मंचाळ यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, बराच वेळ दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि महादेव यांचे मित्र पाटील यांनी तोडून घरात प्रवेश केला.
advertisement
तेव्हा घरामध्ये महादेव आणि रंगम्मा हे दोघेही मृतावस्थेत आढळले. हे दृश्य पाहून परिसरात खळबळ उडाली. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. वैद्यकीय अहवालानुसार दोघांचा तोंड दाबून गुदमरवून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महादेव आणि रंगम्मा यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या नावावर काही मालमत्ता असून घराशेजारी सुमारे साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा आहे. त्यातील काही जागा विकण्याचा आणि काही भागावर घर बांधण्याचा त्यांचा विचार होता. याच मालमत्तेच्या कारणावरून नातेवाइकांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.दरम्यान, मालमत्ता वादातून हा दुहेरी खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय खोमणे करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 9:59 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तहान लागल्याने दरवाजा ठोठावला, शेवटी तोडून आत प्रवेश, वृद्ध दाम्प्त्याची अवस्था पाहून बसला धक्का







