लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 2 महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा, अखेर असा अडकला जाळ्यात
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
ती गर्भवती राहताच पळ काढणाऱ्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेला हा संशयित आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला.
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आणि ती गर्भवती राहताच पळ काढणाऱ्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेला हा संशयित आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील एका ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला भुऱ्या ऊर्फ फुरुशा शहा (रा. मोहाळ) याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपीने मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. जेव्हा ही बाब मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आली, तेव्हा आरोपी भुऱ्या याने तिथून पळ काढला.
advertisement
फेब्रुवारीपासून होता फरार
या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार 11 फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच भुऱ्या हा पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सातत्याने आपली ठिकाणे बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.
advertisement
अनेक दिवस चकवा देणारा भुऱ्या हा गोळेगाव परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या
पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि साध्या वेशात आरोपीची वाट पाहत दबा धरून बसले. जसा संशयित आरोपी गावात दाखल झाला, तसे आधीच तयारीत असलेल्या पोलीस पथकाने त्याला चहुबाजूंनी घेरले आणि मुसक्या आवळल्या. पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, कृष्णा ढाकरे आणि जमील तडवी यांनी ही मोहीम यशस्वी केली.
advertisement
अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे संकटात टाकून पळून गेलेल्या नराधमाला अटक झाल्यामुळे सिल्लोड परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
अल्पवयीन मुला-मुलींच्या बाबतीत अशा घटना घडल्यास समाजाने सतर्क राहून त्वरित कायदेशीर मदत घेणे गरजेचे आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसेल.
advertisement
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 9:09 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 2 महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा, अखेर असा अडकला जाळ्यात








