Kelfulachi Bhaji : आरोग्यासाठी फायदेशीर, पारंपरिक केळफुलाची भाजी करा घरीच, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केळफुलाची भाजी उत्तम पर्याय समजला जातो. अनुभवी सुगरणींच्या सल्ल्यानुसार केळफुलाच्या भाजीसाठी शक्यतो ताजे केळफूल वापरावे.
सांगली : शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केळफुलाची भाजी उत्तम पर्याय समजला जातो. लोह, मॅग्नेशियम, प्रथिने, ई जीवनसत्व अशा अनेक पोषक तत्वांनी पूर्ण असलेला केळीचा कोका किंवा केळफुलाची भाजी कशी बनवायची याची पारंपरिक आणि सोपी रेसिपी जाणून घेऊ. अनुभवी सुगरणींच्या सल्ल्यानुसार केळफुलाच्या भाजीसाठी शक्यतो ताजे केळफूल वापरावे.
केळफुलाची भाजी साहित्य:
केळीचा कोका किंवा केळफूल, ओले खोबरे, हिरवी मिरची/ ठेचा तेल, मोहरी, कडीपत्ता, मिठ हे साहित्य लागेल.
advertisement
केळफुलाची भाजी कृती:
दोन्ही हातांना तसेच टोकदार सुरीला तेल लावूनच केळीचा कोका सोलण्यासाठी घ्यावा. आमसुली रंगाची सालं काढून आतमध्ये असलेले केळ्यांचे गुच्छ वेगळे करून घ्यावेत. कोक्याचा पांढरा भाग दिसेपर्यंत सोलण्याची गरज नाही. वरचे फक्त तीन-चार गुच्छ काढून त्यातील लहान-लहान केळफुले सोलून घ्यावीत. बाकी संपूर्ण कोक्यास, तेल लावलेल्या धारदार सुरीने उभे-आडवे लहान-लहान काप टाकून चिरून घ्या.
advertisement
चिरलेले केळफूल काळे पडू नये म्हणून बारीक होईल तसे लगेच मोठ्या भांड्यात हळदीच्या पाण्यात भिजत ठेवावे. दहा मिनिटानंतर स्वच्छ लाकडी काठीच्या मदतीने केळफुलाचा चिकटपणा बाजूला काढावा. काही वेळ काठी पाण्यामध्ये एकाच दिशेने गोल-गोल फिरवल्यास केळफुलाचा चिकट, काळपट राप काठीवरती जमा होईल आणि भाजी स्वच्छ होईल.
advertisement
यानंतर भाजी पाण्यातून वेगळी करून भांड्यात काढून घ्या. कढईत तेल गरम करावे. मोहरी, कडीपत्ता, ओल्या खोबऱ्याचे वाटण, हिरव्या मिरचीचा ठेचा घालून चरचरीत फोडणी द्यावी. भाजलेल्या वाटणात चिरलेली भाजी टाकून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून भाजी शिजवून घ्यावी.अनेक पोषक तत्वांचा खजिना असणाऱ्या केळफुलाची भाजी बनवण्याच्या अनेक पद्धतींपैकी ही अगदी सोपी पद्धत ठरते.
advertisement
केळफुलाचा समावेश आपल्या आहारात नियमित किंवा वरचेवर ठेवला तर त्याचा उपयोग शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासही होत असल्याचे आरोग्य तज्ञ सांगतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केळफुलाची पारंपारिक रेसिपी नक्की बनवून खा.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
May 24, 2025 3:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kelfulachi Bhaji : आरोग्यासाठी फायदेशीर, पारंपरिक केळफुलाची भाजी करा घरीच, रेसिपीचा Video