तोंडात टाकताच विरघळणार, थकवा आणि टेन्शन दूर पळणार, घरच्या घरीच बनवा मनुक्यांची बर्फी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Raisin Barfi Recipe: हिवाळ्यात आरोग्यदायी पदार्थ बनवण्याकडे गृहिणींचा कल असतो. अत्यंत आरोग्यदायी मानल्या जाणाऱ्या मनुक्यांची बर्फी अगदी काही मिनिटांत आपण बनवू शकता.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आहाराकडे सर्वांचं लक्ष असतं. अनेकजण आपल्या घरात विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवत असतात. अनेकजण शरीरात उष्णता निर्मितीसाठी ड्रायफ्रुट आवर्जून खात असतात. तर काही गृहिणी ड्रायफ्रुट घालून काही खास पदार्थ बनवत असतात. अशीच एक रेसिपी मनुक्यांची बर्फी होय. सांगलीतील उद्योजिका सारिका होनमाने यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी मनुक्यांच्या बर्फीची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
मनुक्याची बर्फी बनविण्यासाठी साहित्य
मनुक्याची बर्फी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. पिवळे मनुके 250 ग्रॅम, तूप - दोन चमचे, दूध पावडर 100 ग्रॅम, गुळ किंवा साखर 150 ग्रॅम, काजू किंवा बदाम- चवीप्रमाणे घ्यावेत.
मनुक्याची बर्फी बनविण्याची कृती
250 ग्रॅम मनुके साध्या पाण्याने दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. मनुके पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवावेत. भिजलेल्या मनुक्यातील उरलेले पाणी काढून टाकावे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. मंद आचेवर कढई ठेवावी. गरम कढईमध्ये दोन चमचे तूप घालावे. कडलेल्या तुपामध्ये मनुक्याची पेस्ट घालावी. पेस्ट सतत परतत राहावी. थोडासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये दूध पावडर घाला.
advertisement
तयार मिश्रणात नंतर बारीक चिरलेला गुळ किंवा साखर घाला. 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर सर्व मिश्रण एकसारखे परतत राहावे. 15 ते 20 मिनिटात मिश्रण घट्ट येताच त्यामध्ये वेलची पावडर टाकावी. गॅस बंद करून एका ताटाला तूप लावून त्यावरती गरम मिश्रण पसरून घ्या. पसरलेल्या मिश्रणावरती काजू किंवा बदामाचे तुकडे टाकावेत. मिश्रण हलकेसे थंड होताच त्याच्या वड्या पाडाव्या. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते.
advertisement
दरम्यान, मनुके हे आरोग्यासाठी लाभदायी मानले जातात. मनुक्याचे पदार्थ खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो. त्यामुळे अनेक पदार्थांत देखील त्यांचा वापर केला जातो. परंतु, फक्त मनुक्यांपासून बनणारी ही आरोग्यदायी बर्फी आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरातही बनवू शकता.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 17, 2024 9:59 AM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
तोंडात टाकताच विरघळणार, थकवा आणि टेन्शन दूर पळणार, घरच्या घरीच बनवा मनुक्यांची बर्फी