बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी, मुंबई-ठाण्यासह कसं असेल आजचं हवामान?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशीला आज बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरु असताना पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईत शुक्रवारी रिमझिम पावसाच्या सरी होत्या, मात्र सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30-40 किमी सोसाट्याचे वादळी वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होईल त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, कोल्हापूर घाटपरिसरात देखील आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठे ढगाळ वातावरण राहील तर कुठे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. आजनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार असून हवापालट होणार आहे.
पुण्याच्या घाट परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे शहर आणि परिसरात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. 5 आणि 6 तारखेला नाशिकचा घाट भाग, नंदुरबार, धुळे येथे मुसळधार तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
विदर्भात मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. विदर्भातील बहुतांश भागात सामान्यतः ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
7 तारखेला राज्यातील केवळ तीन ते चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. 8 आणि 9 सप्टेंबरपासून वारं फिरणार असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 7:07 AM IST