1600 मीटर धावताना खाली कोसळला अक्षय, अंगावर खाकी वर्दी चढण्याआधीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पोलीस भरतीच्या १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत बुलढाण्याचा अक्षय मिसाळ याचा मृत्यू झाला. बीड, सांगलीनंतर मिरा भाईंदरमध्ये तिसरा मृत्यू, राज्यभर खळबळ.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस भरती, RPF भरतीसाठी मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचणीदरम्यान 1600 धावण्याची चाचणी अक्षरश: तरुणांच्या जीवावर बेतते की काय असा प्रश्न पडला आहे. राज्यात ही चाचणी देत असताना तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे यापूर्वी बीड, सांगली आणि आता मिरा भाईंदरमध्ये तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
"आई, आता खाकी वर्दी घालूनच गावात येईन," असा शब्द देऊन बुलढाण्याचा अक्षय मुंबईच्या दिशेने निघाला होता. डोळ्यांत पोलीस होण्याचं स्वप्न आणि उरात घरची परिस्थिती बदलण्याची जिद्द घेऊन तो घाटकोपरच्या रेल्वे पोलीस मैदानावर उतरला. मैदानी चाचणीत त्याने १६०० मीटरचं अंतर पूर्णही केलं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. धावण्याची शर्यत जिंकली खरी, मात्र काही वेळातच अक्षयने आयुष्याची शर्यत कायमची हारली.
advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील ३० वर्षीय अक्षय मिसाळ सोमवारी सकाळी घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर भरतीसाठी आला होता. तिसऱ्यांदा तो नशिब आजमावत होता. सकाळी १० च्या सुमारास अत्यंत चुरशीच्या १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत त्याने आपले सर्वस्व पणाला लावले. चाचणी पूर्णही झाली, पण त्यानंतर काही क्षणांतच अक्षयला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला.
advertisement
अक्षय बेशुद्ध पडताच तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. ज्या खाकी वर्दीसाठी त्याने रात्रंदिवस घाम गाळला, जिवाचं रान केलं, ती वर्दी अंगावर चढण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
अक्षयच्या निधनाची बातमी बुलढाण्यात त्याच्या गावी पोहोचताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातून हसतमुखाने निघालेला मुलगा आता कधीच परतणार नाही, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 2:31 PM IST








