"माझी आई, माझा भाऊ...", भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस ठाण्यात जाताच तरुणीचा खळबळजनक खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. आता या प्रकरणातील तरुणी समोर आली असून तिने सगळा घटनाक्रम सांगितला आहे.
सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड: मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. इथं एका तरुणीचं तिच्या आई आणि भावादेखत अपहरण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडित तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या तरुणासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या अपहरण प्रकरणातील तरुणी समोर आली असून तिने या अपहरणामागची सगळी स्टोरी सांगितली आहे.
माझी आई आणि माझ्या भावाने केलेली तक्रार खोटी असून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली नव्हती. शिवाय त्यांच्यावर काठीने हल्ला देखील करण्यात आला नाही, असा खुलासा संबंधित तरुणीने केला आहे. ज्या तरुणावर तिच्या अपहरणाचा आरोप आहे, तो तरुण मागील एक वर्षापासून तिच्या संपर्कात होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं.
advertisement
तरुणीने याची कल्पना आपल्या आईला आणि दोन्ही भावांना देखील दिली होती. मात्र घरातून दोघांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणामुळे तरुणीच्या घरच्यांनी तिचा विवाह अन्य एका तरुणाशी जुळवला होता. २२ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह होणार होता. या लग्नाला तरुणीचा विरोध होता. तरीही घरच्यांनी तिच्या इच्छेविरोधात हा विवाह ठरवला होता. यामुळेच तरुणीने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
घटनेच्या दिवशी तरुणी आपल्या कुटुंबासोबत मार्केटला जाणार होती. याची माहिती तरुणीने स्वत: आपल्या प्रियकराला दिली होती. तसेच त्याने कुठे थांबायचं, हे ठिकाण देखील ठरवण्यात आलं होतं. प्लॅननुसार, तरुण त्या ठिकाणी थांबला आणि तरुणीने देखील संधी शोधून कुटुंबीयांपासून काढता पाय घेत, तरुणापर्यंत पोहोचली. यानंतर इथून दोघेही एका चारचाकी गाडीतून पळून गेले, असा घटनाक्रम तरुणीने सांगितला आहे. तसेच आता आपल्याला पुन्हा घरी जायचं नाही. त्याच तरुणासोबत लग्न करायचं आहे, असंही तरुणीने सांगितलं आहे.
advertisement
याशिवाय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपांवर देखील तिने प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही नेत्यांचे दावे खोटे आहेत. माझं बळजबरीने अपहरण झालं नाही. मी स्वमर्जीने आले आहे. तसेच स्पष्टीकरणाचा व्हिडीओही खरा आहे, तो व्हिडीओ काढताना माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असंही तिने सांगितलं.
Location :
Indapur,Pune,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 7:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"माझी आई, माझा भाऊ...", भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस ठाण्यात जाताच तरुणीचा खळबळजनक खुलासा






