घरगुती वादातून मेव्हण्यानंच केला भाऊजींवर सशस्त्र हल्ला; सीसीटीव्ही कैद
- Published by:Prachi Amale
Last Updated:
रागातून महेश काजवे यांनी यापूर्वीही मनोज बडवे यांना शिवीगाळ व धमक्या दिल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील एएससी कॉलेज परिसरात काल सकाळच्या सुमारास ए वन वडा सेंटरचे मालक मनोज बडवे यांच्यावर सख्खे भाऊजी महेश काजवे यांनी जुना कौटुंबिक वाद मनात धरून प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मनोज बडवे हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपले दुकान उघडत होते. त्याचवेळी महेश काजवे हे अचानक तेथे आले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मनोज बडवे यांच्या डोक्यावर लाकडी माऱ्याने जोरदार वार केला. या हल्ल्यात मनोज बडवे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमी मनोज बडवे यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले.
advertisement
शिवीगाळ व धमक्या दिल्याचेही समोर
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. तपासात उघड झाले की, मनोज बडवे आणि महेश काजवे हे जवळचे नातेवाईक असून गेल्या काही वर्षांपासून मनोज बडवे हे महेश काजवे व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र महेश काजवे हे कोणतेही कामधंदा न करता दारूच्या नशेत राहत असल्याने घरगुती वाद वाढले. अखेर सुमारे दोन वर्षांपूर्वी मनोज बडवे यांनी त्यांना घराबाहेर काढले होते. त्याच रागातून महेश काजवे यांनी यापूर्वीही मनोज बडवे यांना शिवीगाळ व धमक्या दिल्याचे समोर आले आहे.
advertisement
एक दिवसाची पोलीस कोठडी
हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी महेश काजवे यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी गोंधळ घालत घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून संशयित आरोपी महेश काजवे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे एएससी कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 7:15 PM IST








