प्रेयसी ठरली कर्दनकाळ; बालपणीच्या मित्राचा निर्घृण खून, संभाजीनगरला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आपल्या बालपणीच्या जीवलग मित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ. संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या बालपणीच्या जीवलग मित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे. दोघांनाही एकच मुलगी आवडत होती, याच कारणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी परभणीतून दोघांना अटक केली आहे.
ही घटना बुधवारी रात्री वाळूज येथील लांजी रोड परिसरातघडली. लहानपणापासून सोबत वाढलेल्या जिवलग मित्रानेच २२ वर्षीय तरुणाला धारदार चाकूने भोसकून त्याचा खून केला. प्रथमेश गायकवाड असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर रितेश नरवडे असं आरोपीचं नाव आहे. दोघंही बालपणापासूनचे जिवलग मित्र होते. ते एकत्र शाळेत शिकले. दोघंही एकमेकांच्या घरी ये-जा करत असत. पण त्यांच्या मैत्रीत एक मुलगी कर्दनकाळ ठरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रथमेश आणि रितेश यांना एकच मुलगी आवडत होती. ती कुणाची गर्लफ्रेंड होणार? यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. काही महिन्यांपासून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. नवरात्रात सहाव्या दिवशी रितेश आपल्या आईला घेऊन गायकवाड यांच्या घरी भांडण्यासाठी आला होता. त्याच प्रेमप्रकरणातून उद्भवलेले वैर अखेर खुनापर्यंत पोहोचले. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वाळूज पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना परभणी शहरातून अटक केली.
advertisement
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज-लांजी रोड येथील शिवराई स्मशानभूमीसमोरच्या गल्लीत राहणारा प्रथमेश प्रभाकर गायकवाड हा बुधवारी रात्री जेवण करून घराबाहेर गेला. गल्लीतील सुजीत देवघाटोळे आणि विकास मनाळ या दोन मित्रांसोबत तो लांजी रोडवरील एका बंद दुकानाबाहेर गप्पा मारत होता. दरम्यान, रितेश विजय नरवडे आणि त्याचा साथीदार प्रदीप सुकासे हे दुचाकीवर तिथे आले. रितेश काही काळ प्रथमेशसोबत बोलला. यानंतर अचानक त्याने धारदार चाकू काढून प्रथमेशच्या बरगडीत खुपसला. घाव वर्मी लागल्याने प्रथमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर आरोपी रितेशने चाकूचा धाक दाखवत साथीदारासह दुचाकीवरून पळ काढला.
advertisement
यानंतर प्रथमेशचे मित्र सुजीत आणि विकास यांनी धावत जाऊन प्रथमेशच्या वडिलांना बोलावून आणले. त्यांनी १०८ वर फोन लावून रुग्णवाहिका चालक राजू रोकडे यांच्या मदतीने प्रथमेशला घाटी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. प्रभाकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 10, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्रेयसी ठरली कर्दनकाळ; बालपणीच्या मित्राचा निर्घृण खून, संभाजीनगरला हादरवणारी घटना!