माझा लास्टचा दिवस...! डोळ्यासमोर मेहुण्याचा मृत्यू, तरुणाचं टोकाचं पाऊल, 'त्या' घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: विनोदसाठी हा प्रसंग धक्कादायक आणि असह्य ठरला. “मी त्यांना वाचवू शकलो नाही” ही भावना त्याला वेदना देत होती.
छत्रपती संभाजीनगर: “मला तुमचं खूप ध्यान (आठवण) येतंय, आज माझा लास्टचा (शेवटचा) दिवस आहे, आई-वडिलांना नीट सांभाळ …” असा हृदय पिळवटून टाकणारा मेसेज लहान भावाला पाठवला आणि 25 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. एका दुर्दैवी घटनेत मेहुण्याला वाचवू न शकल्याने तीव्र अपराधी भावनेनं वडगाव कोल्हाटी येथील विनोद लक्ष्मण जाधव याने स्वत:लाच संपवलं. या दुहेरी दुःखद प्रसंगामुळे वडगाव कोल्हाटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं घडलं काय?
वडगाव कोल्हाटी येथील विनोद लक्ष्मण जाधव (25) आणि त्याचे मेहुणे सिद्धार्थ शिवाजी दिवेकर (35) हे दोघे 3 एप्रिल रोजी गट क्रमांक 68 मधील पाझर तलावात पोहण्यासाठी व मासेमारीसाठी गेले होते. पोहोत असताना सिद्धार्थ यांचा पाण्याचा अंदाज चुकला आणि ते खोल पाण्यात जाऊ लागले. ही परिस्थिती पाहताच विनोद यांनी त्यांना वाचवण्यासाठी जीवाचे रान केले, मात्र सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच सिद्धार्थ यांचा दुर्दैवी अंत झाला.
advertisement
विनोदसाठी हा प्रसंग धक्कादायक आणि असह्य ठरला. “मी त्यांना वाचवू शकलो नाही” ही भावना त्याच्या मनावर इतकी बिंबली की तो पूर्णपणे कोलमडून गेला. घटनेनंतर तो तलावाच्या काठावरून थेट 12 ते 15 किलोमीटर अंतर पार करत गादिया विहार परिसरातील रेल्वे रुळांपर्यंत पोहोचला. तिथे आपल्या धाकट्या भावाला, वैभव याला अत्यंत भावनिक व्हॉइस मेसेज पाठवला.
advertisement
मेसेजमध्ये काय?
“मला तुमचं खूप ध्यान येतंय, आज माझा लास्टचा दिवस आहे, आई-वडिलांना नीट सांभाळ …”, विनोदने हा मेसेज धाकट्या भावाला केला आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
संशय वाढला
दरम्यान, दोघेही घरी परतले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. शनिवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची दुचाकी, कपडे आणि मोबाईल सापडल्याने संशय अधिक गडद झाला. माहिती मिळताच पदमपुरा व एमआयडीसी अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत सिद्धार्थ दिवेकर यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.
advertisement
या संपूर्ण प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
माझा लास्टचा दिवस...! डोळ्यासमोर मेहुण्याचा मृत्यू, तरुणाचं टोकाचं पाऊल, 'त्या' घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ







