advertisement

"आई, मी जिंकूनच येणार!'', असं सांगून घराबाहेर पडला; पण पोलीस भरतीचं मैदान गाजवण्यापूर्वीच तरुणाचा करुण अंत

Last Updated:

दीपक वावळ बीडमध्ये पोलीस भरतीच्या १६०० मीटर धावणीत मृत्यूमुखी पडला. भर उन्हात चाचणी घेतल्याने नियोजनावर प्रश्न, प्रशासनाने वेळ बदलली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

News18
News18
"आई, तू काळजी नको करू, यावेळी मी वर्दी जिंकूनच येणार," असे शब्द आपल्या आईला देऊन बीडचा दीपक वावळ पोलीस भरतीसाठी घराबाहेर पडला होता. गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र घेतलेली मेहनत आणि खाकी वर्दीचं स्वप्न डोळ्यांत होतं. जिद्दीने तो मैदानावर १६०० मीटर धावलाही, पण दुर्दैवाने हे धावणं त्याच्या आयुष्याची शेवटची शर्यत ठरली. धावून पूर्ण होताच दीपकला मृत्यूने गाठले आणि एका कष्टकरी कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला.
मैदानावरच कोसळले स्वप्न
दीपक वावळ हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास, भर उन्हात त्याची १६०० मीटरची धावण्याची चाचणी झाली. १६०० मीटरचं अंतर त्याने जिद्दीने पूर्ण केलं, पण त्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
भर उन्हातील चाचणी जीवावर बेतली?
दीपकच्या मृत्यूने पोलीस भरतीच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुपारी १ वाजता, जेव्हा उन्हाचा कडाका सर्वाधिक असतो, तेव्हा धावण्याची चाचणी का घेण्यात आली? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. दीपकच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने आता मैदानी चाचणीच्या वेळेत बदल केला आहे. आता ही चाचणी सकाळी ९ च्या आत आणि सायंकाळी ५ नंतर घेतली जाणार आहे. मात्र, "ही खबरदारी दीपकचा बळी जाण्यापूर्वी का घेतली नाही?" अशी भावना उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.
advertisement
वावळ कुटुंबावर आभाळ फाटले
दीपकच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. ज्या मुलाच्या अंगावर खाकी वर्दी पाहण्याचे स्वप्न आई-वडिलांनी पाहिले होते, त्या मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. "मी जिंकून येणार" हे त्याचे शेवटचे शब्द आठवून आईचा आक्रोश काळजाला घर पाडणारा होता.
उमेदवारांमध्ये संतापाची लाट
पोलीस भरतीसाठी येणारे बहुतांश तरुण हे ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील असतात. मैदानी चाचणीसाठी तासनतास उन्हात उभे राहावे लागल्याने उमेदवारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. दीपकच्या मृत्यूने या तक्रारींमधील गांभीर्य समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"आई, मी जिंकूनच येणार!'', असं सांगून घराबाहेर पडला; पण पोलीस भरतीचं मैदान गाजवण्यापूर्वीच तरुणाचा करुण अंत
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement