लेकरासारखं सांभाळलं त्याच मुलानं सोन्यासाठी केला निर्घृण खून, तुळजापुरात खळबळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dharashiv Police: मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव: तुळजापूर येथील बेपत्ता असलेल्या चित्रा ताई पाटील यांचा मृतदेह सोलापूर ते लातूर बायपास रोडवर नळदुर्ग रोड ब्रिजजवळ सापडला असून त्यांचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या मुलाला पोटच्या मुलासारखे सांभाळले, खायला प्यायला दिले, त्याच मुलाने सोन्याच्या हट्टापायी खून केल्याचे उघड झाले.
त्यांचे पुत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी ओम नितीन निकम या आरोपीला अटक केली असून त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
संग्राम पाटील आणि त्यांची आई एकत्र राहत होते. त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या आणि इतर काही दागिने असे मिळून 15 ते 16 तोळे सोने असायचे. त्या नेहमी सगळे सोने अंगावर परिधान करीत. शेजारील राहणारा 21 वर्षीय ओम निकम हा नेहमी घरी यायचा. त्याच्या लग्नाची आणि लग्न ठरल्याच्या गप्पा चित्रा पाटील यांच्याशी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा ताई घरी नव्हत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर बायकोजवळ आई कुठे गेलीये, याची विचारपूस केली. ओमचा फोन आल्यामुळे त्याच्यासोबत आई गेल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली, पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा पाटील यांचा मृतदेह सापडला परंतु त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने नव्हते.
advertisement
चित्रा पाटील यांनी ज्या ओमला स्वतःच्या लेकरासारखे सांभाळले, त्यांच्या सुख दुःखात आईसारखी खंबीरपणे साथ दिली, आधार दिला, त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला. त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला आणि अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले.
माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य तुळजापुरात घडले असून या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेने तुळजापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
July 22, 2025 6:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकरासारखं सांभाळलं त्याच मुलानं सोन्यासाठी केला निर्घृण खून, तुळजापुरात खळबळ