अज्ञात वीरांच्या शौर्याची गाथा, धाराशिवमधील वीरगळ दुर्लक्षित, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शौर्याची वीरगाथा सांगणारे शिल्पवैभव म्हणजे वीरगळ होय. या वीरगळ आपल्याला काही ठिकाणी दुर्लक्षित आढळतात.
धाराशिव, 8 नोव्हेंबर: प्राचीन काळातील वीरांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या वीरगळ आपल्याला अनेक ठिकाणी आढळतात. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांत आढळणाऱ्या या वीरगळ दुरावस्थेत आहेत. त्यामुळे यादव कालखंड ते बहामनी कालखंडाचा चालता-बोलता इतिहास संकटात आहे. या वीरगळ किंवा वीरशिळा या तत्कालिन वीरांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे, असे इतिहास संशोधक प्रा. धनंजय जवळेकर सांगतात.
धाराशिव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये प्राचीन वीरगळ आढळून येतात. या वीरगळ अज्ञात वीरांच्या शौर्याची गाथा अभिमानाने सांगतात. यादव कालखंडापासून ते बहामनी कालखंडापर्यंत युद्धभूमीवर रणसंग्रामात वीरगती पावलेल्या वीरसैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेली वैशिष्ट्यपूर्ण शिळा म्हणजे या वीरगळ होय. रणांगणात प्राणार्पण करणाऱ्या वीरांचे स्मारक अशी वीरगळ उभारणी मागील प्रेरणा आहे.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील वीरगळ म्हणजे गावांच्या प्राचीनत्वाची ओळख आहे. या वीरगळ ज्या गावात सापडतात त्या गावाच्या प्राचीनत्वाची ही एक ओळख आहे. आपले गाव किती प्राचीन आहे याची साक्ष देणारा ऐतिहासिक पुरावा म्हणून वीरगळकडे पाहिले जाते. आजही या अशा अनेक विरगळ आपल्याला दुर्लक्षित असलेल्या पाहायला मिळतात.
वीरगळ संवर्धनाची गरज
या वीरगळींचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. येणाऱ्या हजारो पिढ्यांना या वीरगळ आपल्या पराक्रमाचा इतिहास सांगतायेत. परंतु असं असलं तरी आजही या वीरगळ आपल्याला दुर्लक्षित असलेल्या पाहायला मिळतात वीरगळींचे, जतन संवर्धन ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुरातत्व विभाग यांच्यामार्फत व्हायला हवे. तरच या वीरगळ टिकल्या जातील आणि हजारो पिढ्यांना आपल्या गावातील आपल्या शुर सैनिकांचा, पराक्रमी पूर्वजांचा इतिहास समजेल, असे इतिहास संशोधक प्रा. धनंजय जवळेकर म्हणतात.
advertisement
अज्ञात वीरांची गाथा
महाराष्ट्रातील बऱ्याचशा वीरगळवर वीरांचा उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे तो वीर नेमका कोण होता? याबद्दल माहिती मिळत नाही. परंतु त्या वीराच्या पराक्रमाचा त्यावेळी कोरलेला इतिहास आजही आपल्याला पाहायला मिळतो, असेही प्रा. जवळेकर म्हणतात.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 08, 2023 4:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
अज्ञात वीरांच्या शौर्याची गाथा, धाराशिवमधील वीरगळ दुर्लक्षित, Video