तुम्ही कधी पाहिलीये का, कशी कापतात मेंढीची लोकर? VIDEO
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिवाळ्यात लोकरीपासून बनवलेल्या कपड्यांना मोठी मागणी असते. मेंढीची लोकर कशी कापतात माहितीये का?
जालना, 8 नोव्हेंबर: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय.
परंपरागत व्यवसाय
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील लक्ष्मण बाहुले हे मेंढीपालन करतात. तसेच मेंढ्याची लोकर काढून विकणे हा त्यांचा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय आहे. मेंढीपासून लोकर काढण्यासाठी सर्वात आधी ज्या मेंढीची लोकर काढायचा आहे तिच्या शरीरावरील केस काढण्या योग्य झालेत का हे तपासावा लागतं. यानंतर मेंढीची निवड केली जाते, असं बाहुले सांगतात.
advertisement
कशी काढतात लोकर?
निवड केलेल्या मेंढीला स्वच्छ धुऊन घेतलं जातं. ज्यामुळे तिच्या केसांमध्ये अडकलेला काडीकचरा स्वच्छ केला जातो. यानंतर मेंढीला कातरण्यासाठी घेतलं जातं. मेंढी कातरण्यासाठी विशिष्ट अशा दोन कैच्या असतात. ज्या संपूर्ण राज्यात फक्त दोनच ठिकाणी मिळतात. जालना जिल्ह्यातील हसना बाद आणि फुलंब्री तालुका अशी ती दोन ठिकाणे आहेत. या दोन कैच्यांच्या साह्याने मेंढीची लोकर काढली जाते. लहान आकाराची विरळ केस असणाऱ्या मेंढीची लोकर काढण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी लागतो. तर मोठ्या आकाराच्या आणि दाट केस असलेल्या मेंढीची लोकर काढण्यासाठी दहा मिनिटांपर्यंत वेळ लागतो, असं लक्ष्मण बाहुले यांनी सांगितलं.
advertisement
मेंढीची लोकर काढल्याने होतात फायदे
मेंढीची नियमित कातरणी केल्यास त्यांचे झिंजुडे झालेले केस साफ होतात आणि त्यांची तब्येत व्यवस्थित राहते. केसांची नियमित सफाई केल्याने केसांमध्ये उवा लिखा होण्याचा धोका राहत नाही. एका मेंढीपासून 100 ग्रॅम ते 500 ग्रॅमपर्यंत लोकर निघते. या मेंढीपासून निघालेल्या लोकरीपासून जुने लोक घोंगडी तयार करायचे. त्याचबरोबर काही शेतकरी लोकरी पासून घोंगडी, गादी, उशी इत्यादी वस्तू तयार करतात. हेच लवकर बाजारात विक्रीसाठी घेऊन गेल्यास त्याला 70 रुपयांपासून 100 रुपये किलोपर्यंत दर मिळतो, असेही बाहुले यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 08, 2023 12:25 PM IST