धक्कादायक! पंजाबी ढाब्यावर नशेचा बाजार, अंमली पदार्थांचा गोरखधंदा उघड
- Reported by:Bhaskar Mehere
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मागील काही काळापासून ढाब्याच्या आडून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुकळी शेतशिवारातील दशमेश पंजाबी ढाब्यावर अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 3 लाख 35 हजार 245 रुपयांचा ड्रग्जसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सरबजितसिंग उर्फ करण भुट्टासिंग ढिलोन (वय 37) आणि जगिरसिंग मुख्त्यारसिंग सिंधू (वय 53 ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, सदर ढाब्यावरून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार पथकाने सापळा रचून अचानक धाड टाकली. तपासादरम्यान ढाब्याच्या आवारात तसेच संशयितांच्या ताब्यातून हेरॉइन (चिट्टा) 18 किलो 15 ग्रॅम, ज्याची अंदाजे किंमत 1 लाख 81 हजार 500 रुपये, तसेच डोडा पावडर 27 किलो 721 ग्रॅम, किंमत 1 लाख 38 हजार 605 रुपये, असा मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. याशिवाय अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
advertisement
ढाब्याच्या आडून चालायचा काळा कारनामा
या प्रकरणात एकूण 3 लाख 35 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत हे दोघेही मागील काही काळापासून ढाब्याच्या आडून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का
advertisement
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा स्रोत, पुरवठा साखळी तसेच या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 10:26 PM IST








