शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य, फडणवीसांकडून समाचार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांच्या फोटो लावण्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले.
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे. कारण त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात शौर्य गाजवले, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. तर त्यांचे हे वक्तव्य एका समुदायाचे लांगूलचालन आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना असे वक्तव्य करताना लाज वाटायला हवी होती, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याप्रकरणी हिंदू संघटनांनी आंदोलन केले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून प्रशासनाने फोटो काढण्याचा निर्णय घेतला. या वादावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांच्या फोटो लावण्याचे समर्थन केले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य गाजवले. रयतेला स्वराज्याचा विचार दिला, त्याच धर्तीवर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे आणि देशासाठी लढणारे भूमिपुत्र होते. त्यांनी कोणत्याही विषारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याच्या दृष्टीने त्यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे.
advertisement
हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, हे तर लांगूलचालन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निषेध
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूल चालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, ते कुठल्या शाळेत शिकलेत? असा बोचरा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
advertisement
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून वाद
मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदे गटाने आंदोलन केले. त्यानंतर वाद उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान यांचा फोटो काढून टाकण्यात आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 5:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य, फडणवीसांकडून समाचार







