Kalyan News: हिंदी बोलल्याने टोळक्याची मराठी तरुणाला मारहाण, तणावातून कॉलेजच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Kalyan: कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मराठी विरुद्ध अमराठी वरून झालेल्या वादातून एका कॉलेजच्या तरुणाने जीवन संपवलं आहे.
कल्याण: कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मराठी विरुद्ध अमराठी वरून झालेल्या वादातून एका कॉलेजच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. ट्रेनमधून प्रवास करताना हिंदीतून बोलल्याच्या कारणातून चार ते पाच जणांनी या तरुणाला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
अर्णव खैरे असं आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो कल्याण पूर्व परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतो. मुलुंड येथील एका कॉलेजमध्ये तो शिकायला आहे. कॉलेजला जाण्यासाठी नेहमी लोक ट्रेनमधून प्रवास करतो. दरम्यान, अलीकडेच लोकल ट्रेनमध्ये झालेल्या एका वादातून झालेल्या मारहाणीनंतर आलेल्या मानसिक तणावामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
advertisement
मयत अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा मुलुंड येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे तो कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होता, त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार घडला.
धक्का लागला आणि 'हिंदी-मराठी' वरून पेटला वाद
वडील जितेंद्र खैरे यांनी केलेल्या आरोपांनुसार, ट्रेनमध्ये अर्णवला एका प्रवाशाने धक्का मारला होता. याच क्षुल्लक कारणावरून संबंधित प्रवाशासोबत त्याचा वाद झाला. यावेळी अर्णव हिंदीतून बोलत बोलत होता. यावेळी हल्लेखोरांनी तुला मराठी येत नाही का? मराठीतून बोल, असं म्हणत वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चार ते पाच जणांनी मिळून अर्णवला ट्रेनमध्येच बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे अर्णव हा मराठी आहे. असं असूनही त्याला मारहाण करण्यात आली.
advertisement
या अमानुष मारहाणीमुळे अर्णव खैरेला मोठा मानसिक धक्का बसला आणि तो प्रचंड तणावाखाली होता. ट्रेनमधील मारहाणीचा तो वारंवार विचार करत होता. या मानसिक तणावातून त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
November 20, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan News: हिंदी बोलल्याने टोळक्याची मराठी तरुणाला मारहाण, तणावातून कॉलेजच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन


