Jay Pawar: आणखी एक पवार राजकारणात करणार एंट्री, बारामतीत उधळणार गुलाल?
- Reported by:JITENDRA JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
रोहित पवारांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आणि तशाच पद्धतीनं जय पवारही...
बारामती: राज्याच्या राजकारणात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. सर्वत्र आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. अशातच आता बारामतीमध्ये पवार घराण्यातून आणखी एक पवार राजकारणात एंट्री करणार अशी चर्चा रंगली आहे. सध्या पवार कुटुंबातील सदस्ये हे राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. आता आणखी एका पवाराची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार पालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार आता निवडणुकीच्या राजकारणात एंट्री घेण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जय पवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी जय पवारांच्या नावाची बारामतीत जोरदार चर्चा आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जय पवार प्रचारात आघाडीवर होते. आई सुनेत्रा पवार तसंच वडील अजित पवारांच्या प्रचाराची धुरा जय पवारांनी सांभाळली होती. तेंव्हापासून त्यांच्या राजकीय एंट्री चर्चा सुरू झाली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही तशी मागणी होऊ लागली आहे.
advertisement
पार्थ पवारांची चूक जय टाळणार?
पार्थ पवार जेव्हा लोकसभा निवडणुकीत उभे राहिले होते, त्या निवडणुकीच्या वेळी केलेली चूक जय पवारांच्या बाबतीत टाळण्य़ाचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जाण्याची शक्यता आहे. 2019 साली पार्थ पवारांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत पार्थ दारुण पराभव झाला होता. या उलट रोहित पवारांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आणि तशाच पद्धतीनं जय पवारही नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Nov 04, 2025 9:43 PM IST








