मोटारसायकलवरून जाताना तरुणाचा गळा चिरला, नायलॉन मांजाने होत्याचं नव्हतं केलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दिनेश पाटील हा तरुण मोटारसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर अडकलेल्या नायलॉन मांजामुळे त्याचा गळा चिरला गेला.
जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे नायलॉन मांजामुळे भीषण प्रकार घडला असून मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणाचा गळा चिरला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.
दिनेश पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश पाटील हा मोटारसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर अडकलेल्या नायलॉन मांजामुळे त्याचा गळा चिरला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत दिनेश पाटील याला चाळीसगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त
दरम्यान, याच ठिकाणी आणखी एका दुचाकीस्वारावरही नायलॉन मांजामुळे धोका निर्माण झाला होता. मात्र वेळेवर अर्जंट ब्रेक मारल्यामुळे तो दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. नायलॉन मांजाचा वापर कायद्याने बंद असतानाही खुलेआम विक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सणासुदीच्या काळात पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून काही ठिकाणी जीवघेण्या घटना घडल्या आहेत.
advertisement
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई
या घटनेनंतर जखमी दिनेश पाटील यांच्या कुटुंबीयांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिस प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर तातडीने बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोटारसायकलवरून जाताना तरुणाचा गळा चिरला, नायलॉन मांजाने होत्याचं नव्हतं केलं









