तुमच्या गाडीची नंबर प्लेट बदलावी लागणार! HSRP बसवण्याची अंतिम मुदत काय? संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
HSRP Rules: राज्यात दुचाकी, चारचाकी किंवा कोणतीही वाहन असेल तर त्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. याबाबत परिवहन अधिकाऱ्यांनी माहिती दिलीये.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: देशात सर्व वाहनांसाठी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) आता अनिवार्य करण्यात आली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे. दुचाकी, चारचाकी किंवा कोणतीही वाहन असेल तर त्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासोबतच अंमलबजावणी यंत्रणेला वाहतुकीचे नियमन करणे सोयीचे होणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे नक्की काय? अशी नंबर प्लेट बसवणं वाहनधारकांना अनिवार्य का करण्यात आलेय? याबाबत लोकल18 ने जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतन यांच्याकडून जाणून घेतलं.
advertisement
बऱ्याचदा गुन्हेगारी कृत्यांसाठी अवैध स्वरुपात वाहनांचा वापर होत असतो. ही वाहने वापरताना दिशाभूल करणारी नंबर प्लेट बसवली जाते. त्याचबरोबर काही वाहनांना नंबर प्लेटच नसते. तर काही नंबर प्लेट या वेगवेगळ्या फॉन्टमध्ये दादा, मामा, काका, बाबा अशा नावाच्या स्वरुपात असतात. यामुळे अंमलबजावणी यंत्रणेला अडचणी येतात. त्याचबरोबर गुन्हेगारांना देखील या माध्यमातून गुन्हा घडवून आणण्यात मदत होते. हे टाळण्यासाठीच संपूर्ण देशभर एक सारखीच पद्धत असावी म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. त्यानुसार 31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनधारकांना अशा पद्धतीच्या नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलंय.
advertisement
एप्रिल 2019 पासून डीलर कडूनच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट पुरवण्यात येत आहेत. मात्र त्यापूर्वी साध्या पद्धतीच्या नंबर प्लेट वाहन चालक आपल्या पद्धतीने आपल्या वाहनावर बसवून घ्यायचे. अशा पद्धतीच्या साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांना त्या नंबर प्लेट बदलून घेणे आवश्यक असणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे नंबर प्लेटमध्ये टेम्परिंग करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चाप बसण्याबरोबरच अंमलबजावणी यंत्रणेलाही मदत होणार आहे, असं परिवहन अधिकारी चिंतन सांगतात.
advertisement
राज्यात झोनची निर्मिती
view commentsही प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्यातील झोन तयार करण्यात आले असून जालना जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकाच्या झोनमध्ये आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन वाहनधारक नोंदणी करू शकतात. तसेच अधिकृत डीलर कडून हाय सेक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनाला बसवून घेऊ शकतात. सर्व वाहनधारकांनी 31 मार्च पर्यंत आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावे, असं आवाहन आरटीओ कार्यालय जालना यांच्याकडून करण्यात आलं आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
February 22, 2025 5:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तुमच्या गाडीची नंबर प्लेट बदलावी लागणार! HSRP बसवण्याची अंतिम मुदत काय? संपूर्ण माहिती

