40 वर्षांचं स्वप्न साकार होणार! कोल्हापूर ते कोकण रेल्वेचा प्लॅन ठरला, कसा असेल मार्ग?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना थेट रेल्वेने जोडणारा कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्ग अखेर सुरू होण्याच्या दिशेने आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेला हा प्रकल्प पुढील वर्षी सुरू होणार आहे.
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना थेट रेल्वेने जोडणारा कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्ग अखेर सुरू होण्याच्या दिशेने आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेला हा प्रकल्प पुढील वर्षी म्हणजे 2027 साली सुरू होणार असून त्यामुळे कोल्हापूर आणि कोकणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,55,445 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामधून महाराष्ट्राला 30,000 कोटी रुपये मिळणार असून त्यातील 3,411 कोटी रुपये कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारही आपला हिस्सा तातडीने देणार असल्यामुळे या मार्गाच्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात होणार आहे. भूसंपादनासाठी सुमारे 1,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
advertisement
कोल्हापूरला कोकण रेल्वेशी जोडण्याची मागणी गेल्या 40 वर्षांपासून होत होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे तेव्हा जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर सर्वेक्षण, डीपीआर आणि मंत्रिमंडळाची मंजुरी अशा प्रक्रिया पूर्ण झाल्या. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी जवळपास 9 वर्षे लागली.
advertisement
हा रेल्वे मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांमधून तसेच कोकणातील वैभववाडी तालुक्यातून जाणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 107.65 किलोमीटर असून त्यासाठी 638.6 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 6,300 कोटी रुपये इतका आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के खर्च उचलणार आहेत.
advertisement
या मार्गावर एकूण 27 बोगदे असतील. त्यांची एकत्रित लांबी सुमारे 28 किलोमीटर आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 किलोमीटर लांबीचा असेल. तसेच रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल, 74 छोटे पूल आणि 55 मोठे पूल उभारले जाणार आहेत. या रेल्वे मार्गावर एकूण 10 स्थानके प्रस्तावित आहेत.
हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास सोपा होणार असून व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. सुमारे 55 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 2:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
40 वर्षांचं स्वप्न साकार होणार! कोल्हापूर ते कोकण रेल्वेचा प्लॅन ठरला, कसा असेल मार्ग?









