advertisement

कारवाई केल्याशिवाय सुटका नाही! पाहणी करायला आलेल्या अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी ठेवलं चक्क कोंडून

Last Updated:

संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्याला घेराव घालत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

News18
News18
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीला काळेकुट्ट मळीमिश्रित पाणी आल्याने जलचर प्राणी मृत पावले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील गावांत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे आज ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. कृष्णा नदीत वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे अधिकारी रोहिदास मातकर पाहणीसाठी आले असता संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. कारवाई झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा सज्जड इशारा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कृष्णा नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असताना जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतींमधील विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड व घालवाड येथील नागरिकांनी वारंवार मंडळाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करत दोषी उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित यंत्रणा तात्काळ सील करण्याची मागणी करण्यात आली.
advertisement

ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला

पंचायत समिती सदस्य सीमा म्हैशाळे, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसह प्रदूषित भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. आरोग्याशी खेळणाऱ्यांना संरक्षण आणि तक्रारदारांना केवळ प्रतीक्षा ही दुटप्पी भूमिका थांबवा, असा सवाल करत ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला.
advertisement

दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन

दरम्यान, संबंधित उद्योगांवर तातडीने कठोर कारवाई करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्ष कृती होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कारवाई केल्याशिवाय सुटका नाही! पाहणी करायला आलेल्या अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी ठेवलं चक्क कोंडून
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement