उन्हाळ्यात पक्ष्यांनाही होतो उष्माघाताचा त्रास, पाहा कशी घ्यावी काळजी? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
उन्हाळ्यात पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सामान्य नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज असून याबाबत पक्षीमित्र नामजोशी यांनी माहिती दिलीय.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : दरवर्षी उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. यंदाही तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचण्याची चिन्हे आहेत. तीव्र उष्णतेमुळे अनेकजण उष्माघाताचे शिकार होतात. यातच माणसांबरोबरच पशुपक्ष्यांमध्ये ही उष्माघाताचे प्रमाण पाहायला मिळत आहे. कित्येक पक्षी उन्हामुळे मरून पडलेले पाहायला मिळत आहेत. कोल्हापुरात देखील अशाप्रकारे उष्माघात झालेले पक्षी आढळत आहेत. या अशा पक्षांवर उपचार करण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी म्हणून बऱ्याचदा मदतीचे फोन कोल्हापुरातील धनंजय नामजोशी यांना येत असतात. पण पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सामान्य नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज असून याबाबत नामजोशी यांनी माहिती दिलीय.
advertisement
धनंजय नामजोशी हे कोल्हापुरात गेली कित्येक वर्षे प्राणी आणि पक्षांचे बचाव आणि पुनर्वसन करत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात त्यांना प्राण्यांसोबतच पक्षांच्या बचावासाठी देखील बरेचसे फोन कोल्हापूर शहराच्या विविध भागातून येत आहेत. कोल्हापूरचे वातावरण हे दिल्ली, मुंबई सारखे बनले आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या तापमानवाढीचा त्रास माणसांबरोबर सर्व पशुपक्ष्यांना होत आहे, असे धनंजय यांनी सांगितले.
advertisement
आकाराने मोठ्या पक्ष्यांनाही होतो त्रास
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास हा जवळपास सर्वच पक्ष्यांना होत आहे. घार, घुबड अशा मोठ्या पक्ष्यांना देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हामुळे एका जागी मलून होऊन पडणे, मान टाकणे, चोचीतून पाणी, लाळ गळणे असा त्रास पक्षांना होत राहतो. अशा प्रकारच्या पक्षांना त्या परिस्थितीतून बाहेर काढून धनंजय नामजोशी पशुवैद्यकीय उपचार मिळवून देतात. त्यानंतर त्या पक्ष्यांना त्यांच्या अधिवासात पुन्हा सोडून दिले जाते, असेही धनंजय यांनी सांगितले आहे.
advertisement
सामान्य नागरिकांनी काय घ्यावी काळजी?
सध्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंतचे कडक ऊन हे सर्वांच्या आरोग्यासाठीच घातक ठरत आहे. त्यामुळेच पक्ष्यांनाही या वेळेत खाण्यासाठी किंवा पाण्यासाठी बाहेर फिरायला लागू नये, यासाठी स्वतःच्या घराजवळच सावलीत पक्ष्यांसाठी पाणी आणि खाण्याची सोय सर्वांनी केले पाहिजे. एखाद्या पक्ष्याला जर आपल्यासमोर त्रास होत असेल, तर त्याला पाणी पाजवून पक्षीमित्रांशी किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क करावा. त्याचबरोबर हा उद्भवणारा त्रास बेसुमार वृक्षतोडीमुळेच वाढत चालला आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक असल्याचे देखील धनंजय यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, या मुक्या जीवांना होणाऱ्या त्रासामागे मनुष्याने केलेली निसर्गाची हानी देखील तितकीच जबाबदार आहे. त्यामुळेच अशा प्राणी आणि पक्ष्यांना मदत करणे, त्यांना या उन्हाच्या तडाख्यापासून वाचवणे हे देखील प्रत्येक माणसाचं कर्तव्यच आहे. प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही धनंजय यांनी स्पष्ट केले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
April 06, 2024 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
उन्हाळ्यात पक्ष्यांनाही होतो उष्माघाताचा त्रास, पाहा कशी घ्यावी काळजी? Video