'पतीला दारू पाजून...', मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटातील आरोपीच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या खूनाच्या कटातील आरोपी अमोल खुणेच्या पत्नीनं मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली. त्यांनी अडीच कोटीत आपल्या जीवाचा सौदा केला, असा आरोप जरांगे यांनी केला. पण धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, जेव्हा मनोज जरांगेंच्या हत्येचा कट उघडकीस आला, तेव्हा जालना पोलिसांनी अमोल खुणे आणि दादा गरड नावाच्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हाही दाखल केला. संबंधित दोन्ही आरोपी धनंजय मुंडे यांचे पीए कांचन पाटील यांच्या संपर्कात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला होता.
या सगळ्या घडामोडीनंतर आता मनोज जरांगे खूनाच्या कटातील आरोपी अमोल खुणेची पत्नी समोर आली आहे. तिने आपल्या पतीला फसवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या पतीला अडकवलं जात आहे, ते मनोज जरांगे पाटलांबाबत एकही चुकीचा शब्द सहन करत नव्हते. माझ्या पतीच्या रक्तात गद्दारी नाही. त्यांना दारू पाजून फसवलं गेलं आहे. जरांगे पाटील आणि माझ्या पतीने एका ताटात शिळ्या भाकरी खाल्ल्या आहेत. जरांगे पाटलांना भेटून मला त्यांच्याशी बरंच काही बोलायचं आहे, असं अमोल खुणे याच्या पत्नीने म्हटलं आहे. तर माझा मुलगा असं करूच शकत नाही, असं अमोल खुणेच्या आईनं म्हटलं आहे.
advertisement
अमोल खुणेच्या कुटुंबीयांनी अशाप्रकारे प्रतिक्रिया दिल्याने आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे. मनोज जरांगे यांचे अमोल खुणे याच्यासोबत काही जुने फोटो देखील समोर आले आहेत. तसेच अमोल खुणेच्या पत्नींनी मनोज जरांगेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना भेटून बरंच काही बोलायचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे नक्की आणखी काय माहिती आहे? याबाबत देखील सस्पेन्स निर्माण झाला आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
November 08, 2025 9:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पतीला दारू पाजून...', मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटातील आरोपीच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट


