लंडनच्या गोऱ्या मॅमच्या हाती मावळचं लाल गुलाब! पुण्यातल्या छोट्याशा गावातून 30 कोटींची उलाढाल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मावळच्या मातीचा सुगंध सातासमुद्रापार! लंडनच्या 'मॅम'च्या हातात पुण्याचे गुलाब; व्हॅलेंटाइन डेमुळे शेतकऱ्यांची 30 कोटींची उलाढाल
अनिस शेख, प्रतिनिधी मावळ (पुणे): जेव्हा लंडनच्या एखाद्या रस्त्यावर किंवा दुबईच्या आलिशान मॉलमध्ये एखादं जोडपं एकमेकांना लाल गुलाब देऊन प्रेमाची कबुली देईल, गोऱतेव्हा त्या फुलाच्या सुगंधात मावळच्या मातीचा गंध दडलेला असेल. लंडनच्या गोऱ्या मॅमच्या हातात लाल रंगाचं गुलाब असेल पण त्याला गंध मावळच्या मातीचा असेल. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घामातून फुललेला लाल गुलाब आता जागतिक बाजारपेठेत आपला रुबाब दाखवण्यासाठी सज्ज झाला.
मावळ तालुका हा तसा निसर्गसंपन्न, पण इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पॉलीहाऊसच्या जोडीने गुलाबाचं नंदनवन फुलवलं आहे. यंदा हवामानाने साथ दिली आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ आलं. 'टॉप सिक्रेट' या जातीच्या लाल गुलाबाने तर अक्षरशः बाजारपेठ काबीज केली आहे. एक दोन नाही तर चारहून अधिक देशांमध्ये मावळमधील लाल गुलाब एक्सपोर्ट केलं जातं.
साई रोज या फूल उत्पादक संस्थेचे दिलीप काळे सांगतात, "यंदा फुलांचा दर्जा आणि आकार इतका उत्कृष्ट आहे की, युरोपपासून गल्फ देशांपर्यंत सर्वच ठिकाणी मावळच्या गुलाबांना मोठी पसंती मिळत आहे. जेव्हा आमचं फूल परदेशातील एखाद्याच्या हातात जातं, तेव्हा तो केवळ व्यापार नसून आमच्या मातीचा अभिमान असतो." मावळातून होणारी गुलाबांची उलाढाल थक्क करणारी आहे.
advertisement
परदेशी निर्यातीमधून सुमारे ७० ते ८० लाख गुलाबांची निर्यात केली जाते. यामध्ये लंडन, हॉलंड, दुबई, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशांमध्ये गुलाबांची निर्यात होते. ९० लाख ते १ कोटी गुलाबं ही देशांतर्गत विकली जातात, याशिवाय राज्यात रोज गुलाबं पुरवली जातात ते वेगळंच. ज्या गुलाबाला भारतात 15-20 रुपये भाव आहे तोच परदेशात एका फुलाला २५-३० रुपये भाव मिळतो. एकट्या मावळ तालुक्यातून २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
हे गुलाब परदेशात जाताना कोमेजून जाऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कोल्ड स्टोअरेज आणि शितपेट्यांचा वापर करून ही फुलं डिस्पॅच केली जात आहेत. यामुळे मावळचं हे गुलाब तब्बल १५ ते १८ दिवस अगदी ताजं आणि टवटवीत राहतं. मावळचा गुलाब आता केवळ प्रेमाचं प्रतीक राहिला नसून, तो ग्रामीण भागातील हजारो हातांना रोजगार देणारा आणि शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी आणणारा 'आधार' ठरला आहे. लाल, पांढऱ्या, गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या या छटांनी शेतकऱ्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने रंगीबेरंगी केलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लंडनच्या गोऱ्या मॅमच्या हाती मावळचं लाल गुलाब! पुण्यातल्या छोट्याशा गावातून 30 कोटींची उलाढाल









