नागपूर हादरलं! भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला, जीवलग मित्रानेच केला घात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
उपराजधानी नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे.इथं एका भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
नागपूर: उपराजधानी नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. नागपूरमधील भाजप नगरसेविका मानसी सिमले यांचे पती निखिल श्याम सिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एकेकाळी मित्र असलेल्या तरुणानेच त्यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका तलावाजवळ घडली. निखिल सिमले आणि आरोपी महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे हे दोघेही जुने मित्र आहेत. तलाव परिसरात या दोघांची भेट झाली असता, त्यांच्यात जुन्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपी महेश ठाकरे याने आपल्या जवळील धारदार चाकूने निखिल सिमले यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले.
advertisement
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जखमी निखिल सिमले आणि आरोपी महेश ठाकरे हे दोघेही एका गाजलेल्या हत्याकांडात सहआरोपी होते. त्या गुन्ह्यातून दोघांचीही निर्दोष सुटका झाली होती. एकेकाळी सोबत असलेल्या या मित्रांमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वितुष्ट आले आणि त्याचे पर्यावसान खुनाच्या प्रयत्नात कसे झाले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
advertisement
पोलीस कारवाई आणि प्रकृती
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निखिल सिमले यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 7:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नागपूर हादरलं! भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला, जीवलग मित्रानेच केला घात








