'तू इतर मुलांशी का बोलतेस?' मुळशीत वकिलाचा महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आपल्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रितेश सुरेश ढोरे या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : मुळशी तालुक्यातील पौड परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रितेश सुरेश ढोरे या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी आज पौड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आरोपी रितेश ढोरे याच्याकडे नोकरीला होती. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी कामानिमित्त तिला गाडीत बसवून तो मुळशीच्या दिशेने घेऊन गेला. प्रवासादरम्यान, तू इतर मुलांशी का बोलतेस? असा जाब विचारत आरोपीने तरुणीला स्टीलच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केले.
त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आणि तिचे कपडे फाडले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेवर दबाव टाकत धरणात उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. तरुणीने मदतीसाठी घरी फोन लावण्याचा प्रयत्न केल्यावर, तिला कोळवण रोडवर सोडून आरोपीने तिथून पळ काढला.
advertisement
दरम्यान पीडित तरुणीने धैर्याने पौड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी रितेश ढोरे विरुद्ध भारतीय न्याय संहिता नुसार कलम ७४ , ११८(१) , ११५, ३५१(२) , ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून, अद्याप त्याला अटक न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या आवारात जमून आरोपीचा निषेध केला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहेत. पौड पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 9:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तू इतर मुलांशी का बोलतेस?' मुळशीत वकिलाचा महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला







