दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर धक्का पक्का, राजीनाम्याबाबत प्रशांत जगतापांनी खुलेपणाने सांगितले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भाने त्यांना एक प्रस्ताव दिला.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या संभाव्य शक्यतेने काही पदाधिकाऱ्यांना आनंद झाला आहे मात्र नैतिकतेने राजकारण करू इच्छिणाऱ्यांच्या मनात नाराजीची लाट आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देऊन माझ्या सार्वजनिक जीवनापासून दूर होईल, अशी घोषणा पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षातील नेत्यांकडून सुरू असतानाच त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भाने एक प्रस्ताव दिला.
माझ्या आयुष्यातल्या अनेक निर्णयांमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. मी म्हणतोय म्हणून पक्षाने एखादा निर्णय घेऊ नये, अशा मताचा मी नाही. केवळ पुणे शहरापुरताही मर्यादित निर्णय नसेल तर पक्षाला महाराष्ट्र राज्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असे जगताप म्हणाले.
पवार कुटुंबानेच मला राजकारणात संधी दिली
advertisement
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाच्या संदर्भाने मंगळवारी महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका संपन्न झाल्या. यावर विचारले असता मी आज पक्षाला एक प्रस्ताव दिला आहे. माझे कुणाशीच द्वेषपूर्ण संबंध नाही. पवार कुटुंबानेच मला राजकारणात संधी दिल्याचे जगताप म्हणाले. पण त्याचबरोबर पक्षनेत्यांच्या निर्णयानंतर बुधवारी दुपारी चार वाजता मी माझा निर्णय जाहीर करेन, असे खुलेपणाने जगताप यांनी सांगितले.
advertisement
....तर राजीनाम्यावर ठाम, जगताप यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले
जर पक्षाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर राजीनामा देण्यावर ठाम असल्याचेच जगताप यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. जर तरच्या प्रश्नांना उत्तरे देणार नसल्याचे सांगताना पक्षाने एकत्रिकरणाचा निर्णय घेऊ नये, असेच त्यांना बोलण्यातून प्रतित होत होते.
...तेव्हा मी माझा निर्णय जाहीर करेन
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. सुप्रिया सुळेही बैठकीला होत्या. मी दोघांसमोरही प्रस्ताव ठेवला आहे. उद्या पुण्यात सुप्रियाताई या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. त्यानंतर त्या शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करतील. आम्हा तिघांचीही फोनवरून चर्चा होईल. त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेन, असे जगताप यांनी सांगितले.
advertisement
माझासाठी अमुक निर्णय घ्या असे मी म्हणणार नाही. उद्या कार्यकर्त्याचे म्हणणं ऐकून घ्यावे लागेल. कुणावरही नाराजी किंवा राग असण्याचे कारण नाही. माझे जे काही म्हणणे असेल ते मी उद्या मांडीन, असे जगताप यांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर धक्का पक्का, राजीनाम्याबाबत प्रशांत जगतापांनी खुलेपणाने सांगितले










