'खरात गुरू'साठी रुपाली चाकणकरांची अशीही धडपड, खबरदार पुढारीच्या पत्रकाराने 'ते' पत्र आणलं समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
रूपाली चाकणकरांनी कायदेशीर नोटीस पाठवली तर आम्ही देखील त्यांना कायदेशीर प्रत्युत्तर देऊ. रुपाली चाकणकर यांनी वृत्तपत्र बंद करण्यासाठी देखील
अहिल्यानगर : नाशिकमधली भोंदूबाबा अशोक खरात बलात्कार प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे. या भोंदूबाबा खरातने अनेक पराक्रम केले असून रोज नवनवीन खुलासे होते. खरातसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर वर्षभरापूर्वी खरातचं प्रकरण उघड करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी आता आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाहीतर रुपाली चाकणकर यांनी वृत्तपत्र बंद करण्यासाठीच पोलिसांना पत्र दिलं होतं, असा गौप्यस्फोटही खेमनर यांनी केला.
अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी खबरदारी पुढारी याने कशी चुकीची बातमी दिली, याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. पण, आता खबरदारी पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी चाकणकरांचा दावा खोडून काढला आहे.
"रुपाली चाकणकर यांचा राजीनामा म्हणजे लोकशाहीचा विजय असून पत्रकाराने छापलेल्या बातमीची दखल घेत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे. आम्ही चाकणकरांनी बदनामी केली नाही तर सत्य जनतेसमोर आणण्याचं काम केलंय मात्र यामुळे आपल्या जिवीतास धोका असल्याचं एक वर्षापूर्वी बातमी छापणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी म्हटलं आहे.
advertisement

तसंच, रूपाली चाकणकरांनी कायदेशीर नोटीस पाठवली तर आम्ही देखील त्यांना कायदेशीर प्रत्युत्तर देऊ. रुपाली चाकणकर यांनी वृत्तपत्र बंद करण्यासाठी देखील पोलीस अधीक्षकांसह मला पत्र दिलं होतं. चाकणकर जर म्हणत असतील फोन केला नाही तर त्यांचा CDR काढून तपासा सत्य बाहेर येईल. रुपाली चाकणकर खोटं बोलत आहेत. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचे गुंड आणि राजकीय हस्तकांशी संबंध आहे. हे प्रकारण मी बाहेर काढल्याने जीवितास धोका असल्याची पत्रकार खेमनर यांना भीती असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
रुपाली चाकणकर यांच्या पत्रात काय उल्लेख?
महोदय,
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) एक व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे.
महिलांचे लैंगिक शोषणाबाबत "खबरदार पुढारी" या श्रीरामपूर येथील वर्तमानपत्रात बातमी प्रसारित झाली आहे. प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. सदर बातमी सोबत जोडली आहे.
advertisement
याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अन्वये बातमीची सत्यता कळविण्याबाबत संबंधित संपादक यांना दि. ८ मार्च २०२५ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता. खबरदार पुढारी या वर्तमानपत्राचे संपादक श्री. दत्तात्रय खेमनर यांचे लेखी म्हणणे आयोगास प्राप्त झाले असून, सदर बातमी केवळ मोघम व ऐकीव माहितीच्या आधारे बातमी छापल्याचे मान्य केले आहे. तसेच सबळ कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही, असे लेखी कळविले आहे. सदर लेखी म्हणणे आपल्या माहितीस्तव सोबत जोडले आहे.
advertisement
प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, कोणताही पुरावा नसताना बातमीत समस्त महिलांची बदनामी व त्यांचे चारित्र्याबाबत अपमान होईल असे लिखाण केले आहे. याबाबत त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच खबरदार पुढारीचे संपादक श्री. दत्तात्रय खेमनर यांनी सदर बातमी खोटी असल्याचे त्याच वर्तमानपत्रात तसे प्रसिद्ध करावे, यास्तव प्रसिद्धीनंतर महिलांची बदनामी होईल अशी खोटी बातमी देणारे वर्तमानपत्र बंद करण्यात यावे, अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत आहेत. तरी योग्य ती न्यायोचित कार्यवाही करणेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांना आदेश द्यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १३ (२) नुसार आयोगास mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर आठ दिवसात पाठविण्यात यावा.
advertisement
(मा. अध्यक्षा यांच्या निर्देशानुसार)
आपला विश्वासू,
समुपदेशक, नि. प्रकल्प अधिकारी.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'खरात गुरू'साठी रुपाली चाकणकरांची अशीही धडपड, खबरदार पुढारीच्या पत्रकाराने 'ते' पत्र आणलं समोर







