नियतीचा क्रूर खेळ! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती, दुसरीकडे जवानाचा मृत्यू, साताऱ्यात मन सुन्न करणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सातारा जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा: नियती कधी आणि कशाप्रकारे घाला घालेल हे कुणी सांगू शकत नाही. सातारा जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते पत्नीच्या डिलिव्हरीसाठी गावी आले होते. एकीकडे त्यांची पत्नी बाळाला जन्म देत असताना दुसरीकडे प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. ज्या लेकीच्या जन्माच्या आनंदासाठी ते गावी आले होते, त्याच लेकीवर आपल्या वडिलांचं अंतिम दर्शन घेण्याची वेळ आली. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद (श्रीनगर) येथे कार्यरत होते. प्रमोद यांना आई नाहीये. काही वर्षे आधी आईचं निधन झालं होतं. त्यामुळे पत्नीच्या प्रसूतीच्या (डिलिव्हरी) काळात सोबत राहण्यासाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. शनिवारी काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात होते. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
जन्मताच पित्याचे छत्र हरपले
प्रमोद जाधव यांच्या अपघाताची बातमी समजताच दरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. हृदयद्रावक बाब म्हणजे, शनिवारी सकाळी जेव्हा प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जात होते, त्याच सुमारास त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. घरात पाळणा हालणार म्हणून आनंदी वातावरण असतानाच घराचा कर्ता पुरुष गेल्याने या आनंदावर विरजण पडले. काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीला जग बघायच्या आधीच पित्याचं छत्र हरवलं. अंत्यदर्शनावेळी तिला आपल्या वडिलांच्या जवळ नेण्यात आलं.
advertisement
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शनिवारी दुपारच्या सुमारास जवान प्रमोद जाधव यांच्यावर दरे गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीच्या ठिकाणी जेव्हा प्रमोद यांची पत्नी आणि त्यांच्या नवजात बालिकेला आणण्यात आले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. हा क्षण अत्यंत भावूक होता. प्रमोद जाधव यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 9:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नियतीचा क्रूर खेळ! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती, दुसरीकडे जवानाचा मृत्यू, साताऱ्यात मन सुन्न करणारी घटना!









