Satara ZP Results: २२ वर्षांच्या पोरीने मैदान मारलं, नरेंद्र पाटलांच्या पत्नीला धूळ चारली, मृणाल पाटील 'जाएंट किलर'!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन नरेंद्र पाटील यांना ताकद दिली होती. मात्र बायकोला निवडून आणण्यात नरेंद्र पाटील यांना यश आले नाही.
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील मुंद्रळ कोळे गटातून अवघ्या 22 वर्षांच्या मृणाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. मृणाल पाटील यांनी भाजपचे नेते व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा धक्कादायक पराभव केला. प्राची पाटील यांचा पराभव करून मृणाल पाटील जाएंट किलर ठरल्या.
मुंद्रळ कोळे जिल्हा परिषद गटातून भाजपचे नेते व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांनी जिल्हा परिषदेत पाऊल ठेवावे, यासाठी नरेंद्र पाटील यांनी प्रचंड शक्ती लावली. परंतु अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांना तिकीट देऊन शिवसेनेने मोठा डाव खेळला. युवा मतदार शिवसेनेकडे आकर्षित झाला. शिवाय शंभूराज देसाई यांची ताकद आणि पारंपारिक मतदारांच्या साथीच्या जोरावर मृणाल पाटील यांची सरशी झाली.
advertisement
शंभूराज देसाई यांचा भाजपला जोरदार धक्का, मृणाल पाटील जाएंट किलर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन नरेंद्र पाटील यांना ताकद दिली होती. नरेंद्र पाटील यांच्या मागे शक्ती उभी करून भाजपने राजकीयदृष्ट्या सहकार क्षेत्र तसेच मराठा समाजाला आपल्याकडे घेण्याची महत्वाची खेळी खेळली. मात्र बायकोला निवडून आणण्यात नरेंद्र पाटील यांना यश आले नाही. मृणाल पाटील यांच्या विजयाच्या रुपाने शिवसेना नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला जोरदार धक्का दिला.
advertisement
एका पाटलांनी गुलाल उधळला, दुसऱ्या पाटलांचे कार्यकर्त्यांनी नाराज होऊन मतमोजणी केंद्र सोडले
अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांनी मुंद्रळ कोळे जिल्हा परिषद गटातून प्राची पाटील यांना पराभवाची धूळ चारली. विजयानंतर मृणाल पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. समर्थक कार्यकर्ते गुलालात न्हाऊन निघाले. दुसरीकडे प्राची पाटील यांचे कार्यकर्ते मात्र प्रचंड हिरमुसले. पराभव झाल्याचे कळताच निराशेने त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले.
advertisement
जयकुमार गोरे यांचे बंधू पराभूत
जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकडवाड गटात धक्कादायकरित्या पराभव झाला. त्यांच्या पराभवाने जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला. अरुण गोरे यांना निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी मोठी ताकद लावली. पण मतदारांनी अरुण गोरे यांना नाकारले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara ZP Results: २२ वर्षांच्या पोरीने मैदान मारलं, नरेंद्र पाटलांच्या पत्नीला धूळ चारली, मृणाल पाटील 'जाएंट किलर'!









