सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर दादा आता कृषिमंत्र्यांना घरी पाठवणार? सुनील तटकरे यांचे सूचक वक्तव्य

Last Updated:

Manikrao Kokate: शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्याने असंवेदनशील बोलणाऱ्या आणि वागणाऱ्या कृषिमंत्र्यांनाही घरी पाठवा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे राष्ट्रवादीत याविषयी गंभीर चर्चा सुरू असल्याचे कळते.

अजित पवार आणि माणिकराव कोकाटे
अजित पवार आणि माणिकराव कोकाटे
बालाजी निरफळ, धाराशिव : शेतकऱ्यांच्याबद्दल सतत असंवेदनशील वक्तव्ये करणारे आणि कृषिखात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणून संबोधणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जनतेचा रोष लक्षात घेता आणि प्रतिकात्मक आंदोलनांना तेवढेच गांभीर्याने घेणे गरजेचे असताना राष्ट्रवादी युवक अध्यक्षांनी थेट छावा संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण करून राज्यातील गुंडगिरी थांबणार नाही, याची पुरेपूर दखल घेतली. शेतकऱ्यांच्या पोरांना झालेली गंभीर मारहाण आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा राजीनामा घेतला. मात्र केवळ त्यांचा राजीनामा घेऊन आम्ही शांत बसणार नाही तर शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्याने असंवेदनशील बोलणाऱ्या आणि वागणाऱ्या कृषिमंत्र्यांनाही घरी पाठवा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे पक्षात याविषयी गंभीर चर्चा सुरू असल्याचे कळते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यासंदर्भात अतिशय सूचक वक्तव्ये करीत अजित पवार याबद्दल अंतिम निर्णय घेतील, असे म्हटले.
लातूरमध्ये आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा अखेर राजीनामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने सुरज चव्हाण यांचा राजीनामा झाल्याची असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. सुरज चव्हाण यांची हकालपट्टी करावी यासाठी राज्यभर छावा संघटनेने आज आंदोलन केले. त्यानंतर आज धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी सुनील तटकरे आज धाराशिवमध्ये आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement

पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, दादा कृषिमंत्र्यांना घरी पाठवणार?

बळीराजा संकटात असताना कृषि मंत्रिपदासारखे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील खाते असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले, पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सुनील तटकरे म्हणाले.

सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे कान उपटले

advertisement
काहीवेळेला माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय चुकीची वक्तव्ये केली. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना निश्चित समज दिली. त्यांनी पीकविमा आणि कर्जमाफीसंदर्भात जेव्हा वादग्रस्त वक्तव्ये केली होती, तेव्हाही त्यांना अजित पवारांनी समज दिली होती. काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओवर जो खुलासा केला तो ही अत्यंत चुकीचा होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशा शब्दात तटकरे यांनी कोकाटे यांचे कान उपटले.
advertisement

कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याचेच संकेत

माणिकराव कोकाटे यांचे गेल्या काही महिन्यातले वर्तणूक अत्यंत असंवेदनशील होते. विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ही अतिशय गंभीर बाब आहे, असे सांगत तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याचेच संकेत दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर दादा आता कृषिमंत्र्यांना घरी पाठवणार? सुनील तटकरे यांचे सूचक वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement