पाकिस्तानचं दिवाळं निघणार? खास मित्रानेही फिरवली पाठ; ३ अब्ज डॉलर्सच्या कर्जावरून UAE चा मोठा झटका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
युएईने ३ अब्ज डॉलर्स कर्जवाढ नाकारल्याने पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर मोठा ताण, KSE 100 इंडेक्स १५ टक्क्यांनी कोसळला, डिफॉल्टचा धोका वाढला.
पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचं विदारक वास्तव पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेली मदतीची परंपरा मोडीत काढत संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ३ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मुदत वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तान सरकारने जरी याला 'नियमित प्रक्रिया' म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात ही पाकिस्तानच्या परकीय मदतीवरील परावलंबित्वाची आणि कमकुवत आर्थिक धोरणांची मोठी चपराक मानली जात आहे.
परकीय चलन साठ्याला मोठी गळती
हे ३ अब्ज डॉलर्स पाकिस्तानच्या एकूण परकीय चलन साठ्याच्या तब्बल १८% इतके आहेत. मार्चअखेर पाकिस्तानचा साठा केवळ १६.४ अब्ज डॉलर्स होता, जो जेमतेम तीन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे. आता युएईने आपला पैसा परत मागितल्यामुळे कच्च्या तेलाची आयात आणि इतर व्यापार तुटीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा 'आर्थिक शॉक' ठरला आहे.
advertisement
मित्रांचाही संपला संयम!
आजवर पाकिस्तानने स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी आयएमएफ (IMF), चीन, सौदी अरेबिया आणि युएईकडून मिळणाऱ्या तात्पुरत्या कर्जावरच आपला गाडा हाकला आहे. मात्र, आता अबु धाबीने घेतलेला हा निर्णय एकच गोष्ट अधोरेखित करतो. ती म्हणजे पाकिस्तानला सातत्याने मदत करणाऱ्या मित्र राष्ट्रांचा संयम आता संपत चालला आहे. 'नेहमीच पदरात पाडून घेण्याची' पाकिस्तानची वृत्ती आता त्यांच्याच अंगलट आली आहे.
advertisement
शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणुकीचा आत्मविश्वास डळमळीत
या बातमीचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर झाला आहे. पाकिस्तानचा बेंचमार्क 'KSE-100 इंडेक्स' सुमारे १५% ने कोसळला असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या रुपया स्थिर दिसत असला, तरी परकीय चलन साठ्यावरील दबावामुळे आगामी काळात पाकिस्तानी रुपयाचं मूल्य कमालीचं घसरण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
काय चुकलं? व्यवस्थापन की धोरण?
निर्यात वाढवून उत्पन्न मिळवण्याऐवजी पाकिस्तानने नेहमीच 'कर्ज काढून सण साजरा' करण्यावर भर दिला. यामुळे दर काही वर्षांनी देशाला 'कॅश क्रंच'चा सामना करावा लागतो. आता पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेला (SBP) आयातीवर कडक निर्बंध लादणे किंवा व्याजदर वाढवणे यांसारखे टोकाचे निर्णय घ्यावे लागतील, ज्याचा थेट फटका तिथल्या सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
advertisement
आगीतून फुफाट्यात?
पाकिस्तानला याच महिन्यात १.३ अब्ज डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय रोख्यांची परतफेड करायची आहे, तर दुसरीकडे ते १.२ अब्ज डॉलर्सच्या आयएमएफ कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. जर आयएमएफचा निधी मिळायला उशीर झाला आणि युएईने आपलं कर्ज वसुलीचा तगादा लावला, तर पाकिस्तान अधिकृतपणे 'डिफॉल्टर' घोषित होण्याच्या उंबरठ्यावर उभा ठाकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 12:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पाकिस्तानचं दिवाळं निघणार? खास मित्रानेही फिरवली पाठ; ३ अब्ज डॉलर्सच्या कर्जावरून UAE चा मोठा झटका







