Kalyan Dombivali News : बालेकिल्ल्यातच ठाकरेंची वाताहात, निवडणूक लढवायलाही उमेदवार नाही, महिला आरक्षणानेही अडचणीत भर!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Kalyan Dombivali Election : मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाला आता उमेदवारांची शोधाशोध करावी लागत असल्याची स्थिती आहे.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: शिवसेनेतील फाटाफुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे बालेकिल्ले ढासळले असल्याचे चित्र आहे. कधीकाळी मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाला आता उमेदवारांची शोधाशोध करावी लागत असल्याची स्थिती आहे. त्यातच आता महिला आरक्षणाने ठाकरे गटासमोरील अडचणीत भर टाकली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ठाकरे गटासाठी कल्याण-डोंबिवली हा सर्वांत कठीण रणांगण ठरत आहे. २०१५ मधील प्रचंड ताकदीच्या तुलनेत ठाकरे गटाची आता ‘वाताहत’ झाली आहे. दहा वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत पक्षासमोर उमेदवार, संघटना आणि मतदारसंघ या तिन्ही स्तरांवर गंभीर संकट उभे राहिले आहे.
ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला...
२०१५ च्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेने तब्बल ५१ नगरसेवक निवडून आणत महापालिकेवर वर्चस्व टिकवले होते. भाजपकडे ४१, मनसेकडे ८, काँग्रेसकडे ४, राष्ट्रवादीकडे २ आणि ४ अपक्ष होते. नंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चित्र पालटले. ठाकरे गटाच्या ५१ पैकी फक्त ६ नगरसेवक आता पक्षासोबत उरले असून उर्वरित शिंदे गट आणि भाजपात गेले आहेत. संघटनात्मक ताकद जवळजवळ ढासळल्याचे चित्र आहे.
advertisement
उमेदवाराची मोठा पेच, मागेल त्याला उमेदवारी?
पक्षाच्या स्थानिक पातळीवर उमेदवारांची वाणवा असल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीसाठी कोणताही निकष नसणार असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मागेल त्याला उमेदवारी मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महिला आरक्षणाने कोंडी...
या वेळी केडीएमसीच्या १२२ पैकी तब्बल ६१ जागा महिला आरक्षित आहेत. यामुळे ठाकरे सेनेसह सर्वच पक्षांसमोर महिला उमेदवारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे गटासाठी तर ही परिस्थिती अधिक गंभीर परिस्थिती आहे. बहुतेक महिला नगरसेविका शिंदे गटात गेल्या आहेत आणि नव्याने पूर्णपणे ‘शून्यापासून’ महिला उमेदवार शोधावे लागणार आहेत.
advertisement
बड्या नेत्यांचा पक्षाला धक्का...
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश केला होता. भिवंडीतील ठाकरेंच्या नेत्याने भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर ठाकरे गटात मोठी पोकळी तयार झाली आहे.
निष्ठावंतांनी केली मागणी...
ठाकरे गटातील निष्ठावंतांनी आता पक्षाने आमच्या पाठीशी उभे राहावे असे म्हटले आहे. पक्षावर आमचा विश्वास असून पक्षनेही आता पाठबळ द्यावे असे काहींनी खासगीत बोलताना सांगितले.
advertisement
मनसेसोबत किती फायदा?
view commentsआगामी निवडणुकीत मनसे ठाकरेंच्या सेनेसोबत जरी लढली तरी त्याचा फायदा कितपत होईल या संदर्भात साशंकता आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे उतरली नव्हती, त्यामुळे त्यांचे अधिकृत मतदार संख्या उपलब्ध नाही . तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद देखील नगण्य आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत ठाकरे सेनेला विशेष मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Dombivali News : बालेकिल्ल्यातच ठाकरेंची वाताहात, निवडणूक लढवायलाही उमेदवार नाही, महिला आरक्षणानेही अडचणीत भर!


