Weather Update: उत्तरेकडे रेड अलर्ट! महाराष्ट्रात विकेण्डला हवा बदलणार, 48 तास धोक्याचे हवामान विभागाचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात तापमानात २-४ अंशांची घट, नाशिक नागपूरमध्ये थंडीची लाट, शेतकऱ्यांना द्राक्ष करपा टाळण्याचा सल्ला.
उत्तर भारतात सध्या निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत असून, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीचा थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात पुढील २ ते ३ दिवसांत २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून तिथे प्रचंड हिमवर्षाव होत आहे.
महाराष्ट्रात विकेण्डला हवापालट
या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे वारे कमालीचे थंड झाले आहेत. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्याच्या विविध भागांत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार आहे. नाशिक, जळगाव आणि नागपूर पट्ट्यात तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येऊ शकतो. या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
पुणे आणि उर्वरित मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?
पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागातही पहाटेचा गारवा वाढेल. पुढील २४ ते ४८ तासांत येथे किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळेल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमानात फार मोठी घट होणार नसली तरी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन हवामानात कोरडा गारवा जाणवेल. हवामान तज्ज्ञांच्या मते, हा थंडीचा जोर २-३ दिवस राहील आणि त्यानंतर तापमानात थोडी वाढ होईल. मात्र, २६ जानेवारीपासून पुन्हा एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारताला धडक देणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम कायम राहू शकतो.
advertisement
दोन दिवस ढगाळ हवामान राहणार
पश्चिमेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाचं संकट देखील ओढवलं आहे. अहिल्यानगरपासून ते कोकणापर्यंत सात ते आठ जिल्ह्यांमध्ये साधारणत: दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे दिवसा गरम तर रात्री थंड असं वातावरण राहू शकतं. एकूणच राज्यात किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी चढ आणि उतार होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवणार आहे.
advertisement
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
तापमानातील या अचानक होणाऱ्या बदलाचा परिणाम रब्बी पिकांवर, विशेषतः द्राक्ष, कांदा आणि हरभरा या पिकांवर होऊ शकतो. द्राक्ष बागायतदारांनी 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य फवारणी आणि बागेत धूर करून तापमान राखण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 7:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: उत्तरेकडे रेड अलर्ट! महाराष्ट्रात विकेण्डला हवा बदलणार, 48 तास धोक्याचे हवामान विभागाचा इशारा









