Local Body Election : संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटींची रोकड कोणाची? समोर आली मोठी अपडेट
- Reported by:Harish Dimote
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ahilya Nagar News : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे.
संगमनेर, अहिल्यानगर : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त केली होती. या घटनेमुळे परिसरात राजकीय खळबळ माजली होती.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असून काही ठिकाणी प्रचारही सुरू झाला आहे. तर काही ठिकाणी आघाडी-युतीच्या चर्चा सुरू आहेत. निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून दक्षता घेतली जात आहे. अशातच निवडणूक आयोगाच्या पथकाने एक कोटींची रोकड ताब्यात घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. मागील काही महिन्यात संगमनेरचं राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रोख रक्कम सापडल्याने मोठी खळबळ उडाली.
advertisement
निवडणुकीच्या तोंडावर खळबळ
निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेले असताना एवढी मोठी रक्कम जप्त झाल्याने शहरात चर्चांना ऊत आला होता. या पाठीमागे राजकीय हेतू असण्याची शक्यता, पैसे नेमके कुठे वापरले जाणार होते, आणि याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, या सर्व प्रश्नांवरून वादंग निर्माण झाले. मात्र, तपासात कंपन्यांनी दस्तऐवज सादर केल्यानंतर परिस्थितीत स्पष्टता आली आहे.
advertisement
कारमधून सापडलेले पैसे नेमके कुणाचे?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेली रक्कम अजमेरा आणि अक्षया कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही कंपन्यांनी रकमेचे बँक व्यवहार आणि संबंधित दस्तऐवज पोलिसांनी व निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितल्यावर सादर केले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ही रक्कम धाराशिव येथील बँकेतून काढण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या तपासणीनंतर रात्री उशिरा मोजदाद पूर्ण करून संपूर्ण रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.
advertisement
निवडणूक आयोगाची पुढील कारवाई
निवडणूक आयोगाकडून सध्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी सुरू आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, ही रोकड निवडणुकीतील गैरव्यवहारासाठी वापरण्याचा उद्देश नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रक्कम संबंधित कंपनीकडे परत हस्तांतरित करण्यात येणार आहे.
Location :
Sangamner,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Nov 16, 2025 2:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election : संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटींची रोकड कोणाची? समोर आली मोठी अपडेट








