बीडमध्ये गुंडाराज! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लोखंडी रॉड, काठ्या आणि चाकूचा वापर करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खलापुरी गावात शुल्लक कारणावरून एका तरुणावर चार जणांनी अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोखंडी रॉड, काठ्या आणि चाकूचा वापर करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खलापुरी येथील नितीन कल्याण लोंढे (वय 32) हे गावातील सतीश यांच्या हॉटेलवर गेले होते. काल सायंकाळी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मोमीन पठाण यांच्या मुलाने धिंगाणा घातल्याचा जाब विचारण्यासाठी नितीन लोंढे हॉटेलवर गेले असता, तेथे वादाला तोंड फुटले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच हा वाद हिंसक वळणावर गेला.
हातावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न
advertisement
रोहित तुळशीदास गायकवाड, शुभम आण्णा लोंढे, आसिफ मोमीन शेख आणि साहिल मोमीन पठाण या चौघांनी एकत्रितपणे नितीन लोंढे यांच्यावर हल्ला केला. सकाळी सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात जोरदार वार करण्यात आला. तसेच हातावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याशिवाय उजव्या बाजूच्या बरगडीवरही जबर मारहाण करण्यात आली, त्यामुळे नितीन लोंढे गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
घटनेनंतर जखमी नितीन लोंढे यांना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
दरम्यान, या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास शिरूर कासार पोलीस करत असून, आरोपींच्या अटकेसाठी कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 4:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये गुंडाराज! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल










